"असेल कुणी."
"कुणाचा तरी आधार असता तर तरूण विधवा दोन लहान मुलांना घेऊन अगदी एकटी कशाला राहील? काहीतरी गोम आहे ह्यात. आणि काही तरी लपवण्याजोगं असल्याखेरीज इतकं गप्प कोण राहील? ही अगदी काही म्हणजे काही आपणहून बोलत नाही. फक्त विचारल्या प्रश्नाला उत्तर देते. तेसुद्धा मोजक्या शब्दांत."
अनाहूत एखाद्या नव्या शेजारणीशी ओळख करून घ्यायला जायचं आणि मग ती आपल्याला हव्या तशा एखाद्या साच्यात बसत नाही म्हणून तिच्यावर 'जगावेगळी', 'चमत्कारिक' असा शिक्का मारायचा- हे सगळंच धरमला अनाकलनीय होतं.
एक दिवस धरम ऑफिसातनं परत आला तर बागेत रागिणीबरोबर दोन मुलं.
ती म्हणाली, "ती शेजारी राहायला आलेली बाई आहे ना, क्रांती, तिची मुलं. धरम तुला ठाऊक आहे, तिला कामाला जायचं असलं की ती मुलांना खोलीत ठेवून खोलीला कुलूप घालून बाहेर जाते. ती म्हणते, मुलं सांभाळील असं कुणी तिला माहीत नाही, आणि विक्रम पुरेसा मोठा आहे. तो म्हणे शमाला सांभाळू शकतो."
"सांभाळीत असेल."
"साडेपाच वर्षांचा मुलगा?"
"त्याला काय हरकत आहे?"
"धरम, तू सगळ्या बाबतींत इतका थंड कसा? इतक्या लहान मुलांना तासन्-तास एकटं एका खोलीत कोंडून ठेवणं हे तुला भयंकर वाटत नाही?"
"हे बघ रागिणी, मला काय वाटतं ही गोष्ट अलाहिदा आहे. हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. आपण त्यात नाक खुपसायचं कारणच काय?"
"ही काम तरी कसलं करते कुणास ठाऊक!"
"ती आपणहून सांगत नाही ना? मग तुला काय करायचंय त्याच्याशी?"
"नोकरी म्हणावी तर वेळीअवेळी कधीही जाते-येते. इतकी अनियमित नोकरी कुठली असणार?"
"रागिणी-"
रागिणी नाक खुपसत राहिली. क्रांतीने अधनंमधनं मुलांना आपल्याकडे सोडून जावं असा प्रस्ताव तिने भीतभीतच मांडला. क्रांती बेफिकीरपणे म्हणाली,
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/117
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ११७