पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"ठीक आहे." मुलं रागिणीकडे राहिली काय किंवा खोलीत बसली काय, तिला त्यात काही फरक वाटत नव्हता. ती बाहेर जाताना किल्ली रागिणीकडे ठेवून जायची. मुलांना आपणहून तिनं कधी रागिणीकडे आणलं नाही आणि रागिणीकडून परत नेलं नाही. खोलीचं दार उघडं दिसलं की मुलं परत जायची.
 "धरम. ही किती शांत आणि समजूतदार आहेत! नाहीतर ह्यांच्या वयाची मुलं किती दंगा करतात! बिचारी बालपण हरवल्यासारखी वागतात."
 अगदी परक्या घरी नव्यानंच आलेली म्हटली तरी त्यांचं इतकं मुकाट बसून राहणं धरमलासुद्धा विचित्र वाटायचं. रागिणी त्यांना खाऊ द्यायची गोष्टी सांगायची, चित्रं दाखवायची, त्यांच्याशी खेळ खेळायची; आणि सगळे सोपस्कार ती मुलं अलिप्तपणे करून घ्यायची. आई घरी आल्यावर सुगावा लागला की ती जे काय चाललं असेल ते अर्धवट टाकून चालायला लागायची. मग रागिणीला हिरमुसल्या चेहऱ्याने सावकाश ठोकळे, बाहुल्या रंगवायची पुस्तकं, खडू-सगळं आवरून ठेवताना पाहिलं की धरमला वाटायचं, तिला म्हणावं, बाई ग, जे तुझं नाही त्यात तू मन गुंतवू नको. पण त्यांच्यानं ते झालं नाही. त्याला वाटे, ज्या गोष्टी मला स्पष्ट दिसतात त्या तिला दिसत नाहीत हे कसं शक्य आहे?
 फक्त एकदाच ती कळवळून म्हणाली होती, 'धरम, मी त्याच इतकं करते, माझ्याबद्दल त्यांना काहीच का वाटत नसेल?" आणि धरमनं उत्तर दिलं होतं, "असं कसं होईल? काहीतरी वाटत असलंच पाहिजे."
 महिन्यांमागून महिने जात राहिले. रागिणी लादल्या गेलेल्या निष्काम भावाने त्या मुलांचे करीत राहिली. धरम स्वत:ला विचारीत राहिला, "ह्या सगळ्याचा शेवट कसा? कुठे?"
 सगळ्याचा शेवट झाला क्रांती नक्की काय करते ते त्यांना कळलं त्या दिवशी आणि हा शेवट म्हणजे एक सुरुवात ठरली. बरेच शेवट ठरतात तशी.
 पोलिसांची गाडी येऊन क्रांतीला अटक करून घेऊन गेली. खरं म्हणजे अटक म्हटलं की एक कायदेशीर कृती अभिप्रेत असते. इथे नुसते पोलिस येऊन क्रांतीला उचलून घेऊन गेले.
 धरम म्हणाला, "म्हणजे क्रांतीचं नाव सार्थ होतं तर."
 रागिणी म्हणाली, "कसली पाषाणहृदयी बाई! शेवटपर्यंत मुलांना सांभाळशील का, असे शब्द काही तिच्या तोंडातून निघाले नाहीत. मीच

कमळाची पानं । ११८