पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणीव. कितीही आत्मसमर्थन केलं तरी तिच्यापासून बचाव करता येत नव्हता. खरं म्हणजे समर्थन नव्हतंच. मुलंबाळं, इतर जबाबदाऱ्या, नाजुक प्रकृती काहीच नव्हतं. विक्रम आणि शमाला सबब म्हणून पुढे करण्याचा ढोंगीपणा त्याच्यापाशी नव्हता. सहवासाने थोडीफार जवळीक उत्पन्न झाली होती एवढच. सर्वस्वी आपली मुलं म्हणून त्याने त्यांचा स्वीकार केला नव्हता.
 त्याने फार पूर्वीच आपल्याला मूल होणार नाही ही कल्पना स्वीकारला होती. रागिणीने कधीच स्वीकारली नव्हती. ह्या देशात नको तितकी मुल जन्मत असताना माझ्याच वाट्याला त्यांतलं एकसुद्धा का येऊ नये, असा ज्याला उत्तर नाही असा प्रश्न ती विचारायची. कुणीतरी दत्तक घेण्याबदल बोललं तेव्हा दुसऱ्या कुणाला तरी नको असलेलं मूल मी माझं म्हणून वाढवावं असा तिरकस प्रश्न तिनं उपस्थित केला होता. असं असूनही विक्रम आणि शमामध्ये तिनं इतकं पूर्णपणे गुंतून जाणं ह्यात एक मोठा उपरोध आहे हे तिला जाणवत नव्हतं. ह्याचं कारण असंही असेल, की ह्या बाबतीत अनपेक्षित घटनांचा भाग किती आणि तिने बुद्ध्या घेतलेल्या निर्णयाचा भाग किती हे तिचं तिलाच सांगता आलं नसतं.
 सुरुवात झाली क्रांती त्यांच्या शेजारच्या बंगल्यात आऊट-हाऊसमध्ये राहायला आली तेव्हा. बंगला होता एका उद्योजकाचा. तिथे राहायला आल्या आल्या त्याचा मुलगा काही असाध्य आजाराने मेला. तेव्हापासून तो बंदच करून ठेवलेला होता. आधी काही वर्षं आऊट-हाऊसमध्ये एक चौकीदार असे. पुढे बंगल्यातलं सगळं सामान, फर्निचर हलवलं आणि मग चौकीदाराला रजा दिली गेली. बंगला विकला नाही की भाड्यानं दिला नाही. तसाच पडून होता मग एक दिवस क्रांती आऊट-हाऊस मध्ये राहायला आली.
 रागिणी म्हणाली, "विधवा आहे बिचारी."
 "तू गेली होतीस वाटतं तिच्याकडे?' धरमनं विचारलं.
 "हो. दु:खात दिसते. फारसे काही बोलत नाही स्वत:बद्दल- कुठून आली, तिचा नवरा काय करीत होता, कशानं गेला. मीही काही फारस विचारलं नाही. उगीच कशाला जखमेवरची खपली काढा?"
 परत एक दिवस ती म्हणाली, "खरंच विधवा आहे की दुसरीच काही भानगड आहे कुणास ठाऊक!"
 धरम म्हणाला, "आपल्याला काय करायचंय त्याच्याशी?"
 "जवळचं कुणीच नसेल तिला?"

कमळाची पानं । ११६