पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही अशा परिस्थितीपासून सुटका ह्या दृष्टीनं चारू त्याच्या आजारपणाकडं पाहात होता. आजारी माणसाकडून कोणी कसली अपेक्षा करीत नाही, उलट त्याची प्रत्येक अपेक्षा त्याच्याकडून वदवूनसुद्धा न घेता पुरी करतात.'
 'तुला म्हणायचंय काय? की चारू ही दुखणी मुद्दाम ओढवून घेत होता?'
 'अगदी तसंच नाही, पण त्याच्या नोकरीतले क्रायसेस, मृण्मयच्या जन्माच्या वेळच त्याचं वागणं, त्याची आजारपणं, ह्या सगळ्यांचा एक साचा बनून गेला होता असं नाही का तुला कधी वाटलं? आणि शेवटी त्याचं सारखं नोकऱ्या सोडणंही विचित्रच नव्हतं का?'
 'पण नोकऱ्या सोडण्याची त्यानं दिलेली कारणं योग्य वाटण्यासारखी नव्हती का?'
 'तसं मलाही प्रथम वाटलं. पण अशा प्रसंगांना दहानं गुणलं की ह्या सबंध प्रक्रियेत काहीतरी चुकतंय असं वाटत नाही का? शेवटी ज्यात हेवेदावे, लाचलुचपत, क्षुद्रपणा, भ्रष्टाचार अजिबात नाहीत असं जग फक्त आपल्या कल्पनेतच अस्तित्वात असू शकतं. खरं जग आपल्याला जसं भेटतं तसं स्वीकारावं लागतं.'
 'म्हणजे आदर्शवादाला तुझ्या जगात काही स्थान नाही का?'
 'जरूर आहे. पण तुमचा आदर्शवाद तुम्हाला जगाशी कोणत्याही तऱ्हेची तडजोड स्वीकारू देत नसला, तर ती तडजोड लाथाडण्याचे परिणाम हसत भोगण्याइतका कणखरपणा तरी तुमच्यात हवा. तो नसेल तर तुमच्या आदर्शवादाला काही अर्थ राहात नाही. असा आदर्शवाद म्हणजे व्यवहारातल्या टक्याटोणप्यांपासून स्वत:ला बचावण्यासाठी वापरलेली नुसती ढाल ठरते. चारूच्या बाबतीत तेच झालं. त्याचा आदर्शवाद म्हणजे फक्त एक पळवाट होती.'
 'बरं, क्षणभर आपण गृहीत धरू की चारू ह्या जगात राहायला अयोग्य आहे, अपंग आहे. हे तू त्याला सोडून द्यायला पुरेसं कारण कसं होतं?'
 'तो अपंग आहे एवढंच नव्हे तर तो मलाही अपंग करू पाहातो. त्याचं कुठल्याच नोकरीत जमत नाही तर त्यानं मला नोकरी करू द्यावी. मग तिथं 'पुरुषी अहंकार का आड यावा? त्यानं घरी राहावं, मृण्मयला सांभाळावं. जो एका बाबतीत जगावेगळा व्हायला बघतो त्यानं इतरही बाबतीत व्हायला का कचरावं?'
 विश्वजितनं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तेव्हा ती म्हणाली, 'त्याचं

कमळाची पानं । १०१