पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण म्हणजे चारूला परिस्थिती होती तशीच कायम ठेवायची होती. तिच्यावर तोडगा काढायची इच्छाच नव्हती आणि ह्यातच विकृती होती त्याची. लहान मुलाप्रमाणे तो ठोकर खाऊन आला की मी त्याच्या जखमेवर फुंकर घालावी मलमपट्टी लावावी, अशी अपेक्षा होती. पण त्याचवेळी ही मागणी पुरी करणारी आई मुलाच्या दृष्टीनं जशी अधिकारस्थानी असते, तशी मी नसावी अशीही त्याची अपेक्षा होती. पोटासाठी त्याच्यावर अवलंबून असलेल्या, फक्त गृहिणी म्हणून जगणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेतून मी त्याची अस्मिता जपावी असंही त्याला वाटे.'
 'ह्यात तुझी काही जबाबदारी असू शकेल असं तुला वाटत नाही,का? कदाचित चारूला तुझ्याकडून जे जे हवं ते तू देत गेलीस म्हणून ह्या विशिष्ट दिशेनं तो गेला असेल. तू त्याच्या आयुष्यात आली नसतीस तर कदाचित वेगळ्या दिशेनं गेला असता.'
 'विश्वजित, जबाबदारी मानली म्हणून तर मी इतके दिवस त्याला चिकटून राहिले. पण मी त्याच्याजवळ राहून कुठलाच प्रश्न सुटत नाही, उलट गुंता वाढतच जातोय असं पाहूनच मी हा निर्णय घेतला आणि शेवटी माझी तरी कुचंबणा मी कुठवर आणि कशाच्या जिवावर सहन करायची? गेले कित्येक महिने घर म्हणजे माझा तुरुंग झाला होता. बाहेर गेले तर चारू मिनिटा-मिनिटाचा हिशेब विचारायचा. घरी असले की स्वत: जवळून हलू द्यायचा नाही. घरकाम, मृण्मयचं सगळं, तो बाहेर गेला किंवा झोपला की घाईघाईनं मला आवरून घ्यावं लागायचं. तो आजारी असला की मग आमच्यातलं नातं केवळ नर्स-पेशंट एवढंच राहायचं. तो माझा नवरा तर राह्यचा नाहीच पण मित्रही राहात नसे. हे सगळंच मग मला असह्य झालं तर तू मला दोष देऊ शकतोस?'
 त्यानं मोठा सुस्कारा सोडून मान हलवली. मग तो म्हणाला, 'ठीक आहे. तुझ्या दृष्टीनं तू जे केलंयस ते बरोबर केलंयस असं मानलं तरी चारूचं आता काय होणार हा प्रश्न राहातोच.'
 'त्या प्रश्नाचं कोण उत्तर देऊ शकणार? काठी मोडून पडल्यावर लंगडत खुरडत का होईना चालण्याचा त्यानं प्रयत्न केला तर तो तरेल.'
 'आणि तरला नाही तर?'
 'तर काय वाटेल ते होईल. तशा शक्यता पुष्कळ आहेत.' ती थंड आवाजात म्हणाली.

कमळाची पानं । १०२