पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ स्तबक २ रें. अध्याय १ ला. [ स्तबक मंगलाचरण. देवाधिदेव गजानना ! मी तुला प्रेमपुरःसर वंदन करितों. तसेंच सरस्वती ! बुलाही माझा प्रणाम असून मी आपल्या इष्ट कुलदेवतांनाही साष्टांग नमस्कार करितों. हे शेषशयन अनंता! हे सगुणनिर्गुण विश्वव्यापक नारायणा! हे परमानंदा! तुझा जयजयकार असो. हे अनादिसिद्ध गोविंदा ! हे गुणातीत शुद्धबोधा ! तुला मी अनन्य शरण आलो आहे. हे अव्यक्त परात्पर कैवल्यनिधाना ! हे मंगल- धाम सकलकला परिपूर्ण भगवंता ! मी दीन, अनाथ तुझी करुणा भाकून तुझा आशीर्वाद मागतों. हे वेदगर्भा ज्योतिलिंगा ! हे परमपुरुष मुकुंदा ! भक्तीनें व शुद्ध अंतःकरणानें तुझें नामस्मरण केले असतां या ग्रंथलेखन प्रसंगी येणाऱ्या विघ्नांचा सहजच नाश होईल असा मला भरंवसा आहे. अमृत प्राशन केलें असतां ज्याप्रमाणें मृत्यूची भीति दूर होते, त्याप्रमाणे तुझी कृपा असली लणजे विघ्नेही जळून जातात. हे मुकुंदा ! तुझें स्तवन करण्यास मी पामर अगदींच असमर्थ आहें. मी जें कांहीं तुझें हें नामकीर्तन करीत आहे. त्यांत कांहीं मोठासा पुरुषार्थ आहे असें नाहीं. हा माझा प्रयत्न गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण करण्यासारखा आहे. अथवा सूर्याला आरती करण्यासारखा आहे. आरतीची दीप्ति व सूर्याचें तेज हीं कांहीं दोन नाहींत. त्याप्रमाणे माझें स्तवन हैं तुझ्याच कृपेचें चिन्ह होय. त्यांत माझें असें कांहींच नाहीं. हे विश्वंभरा ! मी तुला शरण येऊन तुझी वारंवार विनंति करीत आहे की, माझ्या हृदयांत जो अज्ञानरूपी अंधःकार आहे तो नाहींसा कर. त्या हृदयप्रांगणावर ज्ञानबीज पेर. ह्मणजे माझा भ्रम दूर होईल व मी तुझें गुणकीर्तन चांगल्या रीतीनें करीन. मी या कथा कल्पतरूचें रोप रोंविलें आहे, परंतु त्याचा मोठा वृक्ष होऊन त्याला तुझीं नाम स्वरूप सुमनें येणें हें सर्वस्वी तुझ्या स्वाधीन आहे. तूं आपलें कृषाजल सिंचन केल्यास हा वृक्ष मोठा होऊन तो मनोहर दिसेल व सर्वोच्या आदराला पात्र होईल. तुझ्या कृपेवांचून हें होणे शक्य नसल्यामुळे मी तुझ्याजवळ कृपामृताची भिक्षा मागत आहे. तें तुझें कृपामृत अमृतापेक्षांहि अधिक महत्वाचे आहे.. आणि ह्मणूनच ज्ञाते अमृतापेक्षां तुझ्या नामामृतानेंच अधिक संतुष्ट होतात. लणून ह्मणतों, हे देवाधिदेवा ! हा कल्पतरू ग्रंथ तुझ्या कृपामृतानें शीतल कर ह्मणजे तो उत्कृष्ट व रमणीय असा होईल.