पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१ लें. ]

अध्याय १० वा.

६१ दमयंती दुःखद स्वरानें म्हणाली; आई, या फाटक्या वस्त्रावर माझें फार प्रेम आहे. तें मी पतीची भेट झाल्यावांचून टाकून देणार नाहीं. अरण्यांत त्यांचें वस्त्र जेव्हां नाहींसें झालें; तेव्हां मी आपल्या या वस्त्राचे दोन भाग केले. एक आपल्या पतीला दिला, आणि एक मी हा आपल्याजवळ ठेविला आहे. आई, आतां कसेंहि करून माझी व माझ्या पतीची भेट होईल असें कर. त्यांची जोपर्यंत भेट होणार नाहीं, तोपर्यंत मला चांगली वस्त्रे, चांगले अन्न, हे कांहीं नको. " हें मुलीचें बोलणे ऐकून सर्वांची अंतःकरणे गहिवरून आला. भीमक- राजा आपल्या सुदेव पुरोहिताला बोलावून म्हणाला; "सुदेव, तुह्मीं प्रयत्न करून जसा दमयंतीचा शोध लाविला, तसाच आतां नळराजाचाहि लाविला पाहिजे. जो कोणी नळाचा शोध लावील त्याला मी संतोषित करीन." तेव्हां पर्णाद नांवाचा एक ब्राह्मण तेथें होता, तो म्हणाला; "राजा, मला वाटतें नळराजा अयोध्येस असावा; कारण मी एक दिवस शरयुनदीचे कांटी बसलों असतांनां, राजाच्या अश्वशाळेवरील कांहीं नौकर घोडे घेऊन नदीवर आले होते. त्यांत बाहुक या नांवांचा एक नौकर होता. तो दुसऱ्या नौकराजवळ ' आपली बायको रानांत चुकली, तिचा मी पुष्कळ शोध केला, पण ती कांहीं मिळाली नाहीं,' वगैरे हकीकत सांगून रडत होता. यावरून मला असे वाटतें कीं, तो बाहुकच- नळराजा असावा. " हें ऐकून सुदेव म्हणाला; " तो नळराजाच जर असेल तर त्यास येथें सहज आणितां येईल. ऋतुपर्ण राजास, नळराजाचा शोध लागत नाहीं म्हणून दमयंतीचें स्वयंवर करीत आहोत असे कळवावें; आणि त्याला कुंकुमपत्रिका अशा बेतानें पाठवावी कीं, येथें यायला एक दिवसाचाच अवकाश मिळेल. जर नळराजा तेथें असेल, तर तो त्याला जरी अयोध शतयोजनें लांच आहे; तरी एका दिवसांत येथें घेऊन येईल. कारण नळराजा हा, अश्वविद्येत फार निपूण आहे. ऋतुपर्ण राजाजवळ सारथी फार कुशल आहे, असा सर्वत्र बोभाटा झालेला आहे, तेव्हां तो बाहुकच बहुतेक नळराजा असेल. " सुदेवाची ही सल्ला सर्वानां पसंत पडली. त्याप्रमाणे लागलीच दमयं- तीच्या स्वयंवराची एक कुंकुमपत्रिका तयार केली व ती सुदेव स्वतः घेऊन, अयोध्येस आला. त्यानें आल्याबरोबर ऋतुपर्ण राजाची भेट घेतली, व त्यास कुंकुमपत्रिका वाचून दाखवून, स्वयंवरास आलेच पाहिजे हाणून विनंति केली, ऋतुपर्ण राजास स्वयंवरास जाण्याची इच्छा झाली, परंतु एका दिवसांत शत योजनें दूर असलेल्या कौंडण्यपुरांत जाणे त्यास अशक्य वाटू लागले; तेव्हां त्यानें बाहुकाला बोलाविले व त्याला तो ह्मणाला; "बाहुका, कौंडण्यपुरास दमयंतीचें दुसऱ्यांदा स्वयंवर होत आहे. उद्यां स्वयंवराचे वेळीं तेथें आपण जाऊन पोहोंचूं असे आपल्या शाळेत घोडे आहेत काय ?" तेव्हां बाहुक म्हणाला; "होय महाराज, शतयोजनें मार्ग क्रमितील असे घोडे आपल्या अध्याय १० वा.