Jump to content

पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४ कथाकल्पतरू. [ स्तबक तुझ्या बापाला माहित आहे. तुला माहित नाहीं हाणून असें भलतेच बोलतेस, अगे, राजे कितीहि मोठे असले तरी ब्राह्मणाच्या आशीर्वादाने त्यांनां राज्य मिळतं, आणि ब्राम्हणांच्या शापाने त्यांची राज्यं नाहींशीं होतात. ब्राम्हण जरी भिक्षार्थी आहेत, तरी रंकाचा राव व रावाचा रंक करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे, हें तुला माहित नाहीं !" हे ऐकून त्या उन्मत्त शर्मिष्ठेला विशेषच राग आला. तिनें रागानें देवयानी जे स्वतःचें वस्त्र नेसली होती तेंहि फेडून घेऊन म्हणाली, "हेंहि वस्त्र तुला माझ्याच कृपेनें मिळालेले आहे, तेंहि मी आपलें घेतें. भिकारडी ती भिकारडी, पण डौल केवढा ! म्हणें राजाचें ऐश्वर्य ब्राम्हणांच्या शब्दावर अवलंबून आहे." असें म्हणून शर्मिष्ठेनें रागानें देवयानीस नग्न स्थितीत एका विहिरींत ढकलून देऊन ती सख्यांसहवर्तमान आपल्या नगरांत निघून गेली. व झालेले वर्तमान कोणीहि कोणाजवळ सांगूं नये अशी तिनें आपल्या सख्यांनां ताकीद दिली. २ ययाति व देवयानी यांची भेट. इकडे ज्या विहिरींत देवयानीस ढकलून दिलें होतें, त्याच विहिरीजवळ ययातिराजा शिकार करून थकल्यामुळे पाणी पिण्यासाठी आला होता. राजानें विहिरींत पाहिलें तो विहिरींत एक तरुण, सुंदर व उपवर अशी स्त्री रुदन करीत आहे. नग्न स्थितीत असलेल्या त्या स्त्रीला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले, व त्याला तिची अत्यंत दया आली. त्यानें आपल्या अंगावरील शेला काढून तो देवयानीच्या अंगावर टाकला व मग त्याने तिला त्या विहिरींतून बाहेर काढलें; व 'जरूर असल्यास तुला तुझ्या घरी पोहोंचतें करितों' असें तो झणाला. तेव्हां देवयानी ययातीचा हात धरून म्हणाली; " तूं मला नम स्थितीत पाहिलेंस, दुसरें, मला तूं आपल्या वस्त्रानें झांकलीस आणि माझ्या हाताला स्पर्श करून बाहेर काढिलेंस. तेव्हां आतां मला तुजबरोबर विवाह करणें भाग झालें आहे. मी शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आहे." हे ऐकून ययाति रोजा म्हणाला; " पण देवयानीं तूं ब्राह्मणकन्या असून मी क्षत्रिय आहे. क्षत्रियानें ब्राह्मणाच्या मुलीबरोबर विवाह करूं नये असे शास्त्र आहे. तेव्हां मला तुझ्याबरोबर विवाह कसा करितां येईल ? धर्माविरहित मी आचरण करणार नाहीं.” तेव्हां देवयानी ह्मणाली, "राजा, तुझें म्हणणे बरोबर आहे, पण मला ब्राह्मण पति मिळणार नाही, असा शाप असल्यामुळे मला क्षत्रियाबरोबर विवाह करणें भाग झाले आहे." ययातिराजा देवयानीचें हें बोलणे ऐकून देवयानीला म्हणाला, "देवयानी, तुला असा कोणाचा शाप झाला आहे, तें ऐकण्याची माझी इच्छा आहे." राजाची ती इच्छा जाणून देवयानी आपली शापाची हकीकत ययातीला सांगू लागली.