पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ९ वा. २ दाक्षायणीचा अपमान. पार्वती कैलासाहून निघाल्यावर लवकरच बृहस्पतीनगराला येऊन पोहोंचली. दुरूनच तिला त्या विस्तीर्ण यज्ञमंडपाचे सुवर्णाचे कळस दिसले. मोठमोठाल्या ध्वजापताका वान्याने फडफड करीत आहेत असे पाहून तिला आकाशांत निरनिराळ्या रंगाच्या आकाशगंगाच उत्पन्न झाल्या आहेत की काय, असे वाटू लागले. जसजशी ती यज्ञमंडपाजवळ येऊं लागली, तसतशी त्या यज्ञाची अधिकाधिक शोभा तिला दृग्गोचर होऊं लागली. रंगवल्लि पताकांनी अलंकृत केलेले रस्ते, ध्वजापताकांनी सुशोभित केलेला मंडप, लतापत्रांनी व केळीच्या स्तंभांनी शृंगारलेले मंडपाचे दरवाजे, रत्नखचित अलंकारांनी व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे द्वारपाल, वगैरे प्रकार पाहून तिला नारदाचें बोलणें सर्व खरें आहे असे वाटलें, अगदी मंडपाजवळ आल्यावर तर ती अगदी थक्क होऊन गेली. ऋषींनी उंच स्वरानें चालविलेला मंत्रघोष, मृदंग वीणादि वाद्यांचे कर्णमनोहर ध्वनि, नूपुरांचा छुमछुम असा नाद, आणि चित्ताकर्षक असें अप्सरांचे संगीत ऐकून पार्वती अगदी गुंग होऊन गेली. मंडपाचे दरवाजाजवळ आल्यावर दाक्षायणी नंदीवरून खाली उतरली, व तिनें नंदीला शिवगणांच्या स्वाधीन करून मंडपांत प्रवेश केला. पार्वतीला पाहिल्याबरोबर प्रसूतीला प्रेमाचें भरतें आलें, व तिनें धांवत धांवत पार्वतीजवळ येऊन तिला घट्ट आपल्या पोटाशी धरिलें. दोघी एकमेकींना पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला, व दोघींच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. प्रेमभरानें दो- धींचे कंठ दाटून आल्यामुळे कोणासही बोलवेना. विशेषतः पार्वतीच्या हातांतील शंखमण्यांचीं कांकणें, स्फटिकमण्याच्या माळा, वेणी न गुंफता मस्तकावर केसांचा असलेला जटाभार, त्यावर रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे त्रिपुंडू, भगव्या रंगाचें साधे वस्त्र, असा तो तिचा दरिद्रावस्थेतील पोषाख पाहून प्रसूतीचें अंतःकरण कळवळून आले. तिनें पार्वतीच्या गालाचें चुंबन घेऊन तिचे अश्रू पुसले, व आपल्या हातांतील सुवर्णाचीं कांकणे काढूत तीं पार्वतीच्या हातांत घातली. नंतर प्रसूतीने तिचा हात धरून यज्ञमंडपांत जेथें आपल्या मुली बसल्या होत्या त्यांच्याकडे घेऊन गेली. प्रसूतीच्या त्या मुलींनी नानारंगांची अनेक प्रकारची रेशमी वस्त्रे परिधान केली होतीं. सोन्या मोत्यांच्या अलंकारांनी त्या नक्षत्रांप्रमाणे चमकत होत्या. त्यांची लहानमोठी मुलेंहि चांगल्या प्रकारच्या वस्त्राभरणांनी अलंकृत होऊन आपआपल्या मातेजवळ बसलीं होती. अशा त्या आपल्या बहिणींना पाहून पार्वतीला मोठे कौतुक वाटलें. प्रसूती आपल्या इतर कन्यांकडे पाहून म्हणाली; " मुलींनो ! ही पहा तुमची बहीण दाक्षायणी, आज किती दिवसांनी तरी तुम्हाला भेटावयाला आली आहे. या तर, हिला आलींगन द्या, व हिचें कुशल विचारा, आणि तुमच्याच