पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक इतकेंच नव्हे, तर तूं त्यांनां आपल्या पातकाचा थोडा थोडा वांटा देऊं लाग- ल्यास ते तो भाग मुळींच घेणार नाहींत, यावरून तूं विचार कर, किं जें पातक तूं आपल्या बायकामुलांसाठी करित आहेस, तें पातक तुला एकट्या- लाच भोगावे लागणार आहे; मग एवढे हें नीच कृत्य करून तुला फायदा तो कोणता ? " हें बकदाल्भ्य ऋषीचें भाषण ऐकून वाल्या कोळ्याला मोठे आश्चर्य वाटलें; तो ऋपीला ह्मणाला; "ऋषि ! मी ज्या बायकामुलांचें आजपर्यंत संरक्षण करित आहे, ते माझ्या पातकाचे वांटेकरी होतील किंवा नाहीं, हें मी त्यांना विचारून येतों, तोपर्यंत तुझी येथेंच उभे रहा.” ती वाल्या कोळ्याची गोष्ट बकदाल्भ्य ऋषींनी कबूल केल्यावर वाल्या कोळी आपल्या घरीं आला व कुटुंबांतील सर्व माणसांस बोलावून तो ह्मणाला, "आजपर्यंत तुमच्या संरक्षणासाठी मी असंख्य जीव मारले आहेत तर या माझ्या पातकाचा वांटा तुझीं घेण्यास तयार आहां किंवा नाहीं तें मला सांगा." तेव्हां त्याची स्त्री ह्मणाली, " अरे ! त्या पातकाची तूं आमच्याजवळ गोष्टहि बोलूं नकोस. मी आपलें एवढे सर्व शरीर तुझ्या भोग विलासासाठी तुला अर्पण केले आहे, तें पापासाठी नसून तुझा पुण्याचा वांटा मिळविण्यासाठी केलें आहे. मी तुझ्या पातकांतील एक रतीभरहि पाप घेण्यास तयार नाहीं. आमचें संरक्षण करणें हें तुझे कर्तव्यच आहे. तूं आपले स्वतःचें मांस कापून जरी माझी क्षुधा शांत केलीस, तरी माझ्यावर तुझे उपकार नाहीत." नंतर वाल्याने आपल्या कन्या पुत्रानां तोच प्रश्न केला, तेव्हां त्यांनींही कानावर हात ठेवून आपल्या आईप्रमाणेच उत्तर दिलें. मग तो वाल्या कोळी आपल्या आईला पातकाचा वांटा स्वीकार ह्मणून ह्मणाला; तेव्हां त्याची आई ह्मणाली; " बाळा! आम्हीं तुझ्या पुण्याचे वांटेकरी आहोत, पापाचे वांटेकरी नाहीं. तुझ्या पापाचा मालक तूंच आहेस. तूं बाहेर काय करतोस, तिकडे लक्ष देण्याचें आम्हांस मुळींच कारण नाही; तूं कोणत्याहि रीतीने आम्हांला आणून देत जा, म्हणजे झालें. " त्या वाल्या कोळ्याला त्याच्या कुटुंबांतल्या सर्व माणसांनी याप्रमाणे स्पष्ट सांगितल्यावर त्याच्या मनाला अत्यंत उद्विग्नता आली, व तो बकदात्भ्य ऋषींकडे परत येऊन म्हणाला; " ऋषि ! पापाचा वांटा घेण्यास कोणीही तयार नाहीं, सर्व पुण्याचे भागीदार आहेत, पापाचे कोणीही नाहींत. हे पाहून माझे मन फार उद्विग्न झाले आहे, तर मी या तापत्रयांतून सुटून पुढे होण्याच्या नरक- यातनेपासूनहि मुक्त होईन, असा कांहीं मला मार्ग दाखवा. " असें म्हणून तो वाल्या कोळी, पश्चात्ताप पावून अत्यंत ऋषिचरणावर गडबडा लोळूं लागला. वाल्याला पुरा पश्चात्ताप झाला आहे, असे जाणून बकदालभ्य ऋषींनां त्याची दया आली. मग त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून उठविलें व कानांत याप्रमाणें गुरूपदेश केल्यावर वाल्या कोळी त्याच बीजमंत्र सांगितला. जागेवर मातीत खाचाड तयार करून, त्या खाचाडांत मंत्राचा जप करीत बसला. V कथाकल्पतरु.