पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय २ रा. पवित्र आहे, तर त्याचें सर्व चरित्र किती पवित्र असेल याची कल्पना करणेंहि अशक्य आहे. राजा जनमेजया ! त्या श्रीरामचंद्राची कथा मी तुला सांगतों; ती तूं आतां श्रवण कर. पृथ्वीवर प्रभु श्रीरामचंद्राचा अवतार होईल असें, ज्या वेळीं कांहीं एक संभव नव्हता त्या वेळीं, वाल्मीकि ऋपीनें शतकोटी रामायण लिहून भविष्य केले. पुढे श्रीरामचंद्राचा अवतार झाल्यावर वाल्मीकीनें रामायणांत ज्या ज्या गोष्टी लिहून ठेविल्या होत्या त्या त्या सर्व घडून आल्या, अशी त्या वाल्मीकि ऋषीची विलक्षण शक्ति होती. श्रीरामअवताराचे पूर्वी ब्रह्मदेवानें रामायण एका श्लोकांत लिहिलें. एके दिवशी ब्रह्मदेव सत्यलोकीं ध्यानस्थ वसला असतां त्याच्या हृदयांत त्याला श्रीरामचंद्राचे दर्शन झालें; आणि पुढे प्रभूच्या हातानें होणाऱ्या सर्व गोष्टी त्याला दिसून आल्या. तेव्हां त्या सर्व चरित्राच्या आशयाचा त्यानें एक श्लोक तयार केला, तो हा किं— आदौ रामतपोवनाधिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं || वालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं पश्चाद्रावणकुंभकर्णननं एतद्धि रामायणम् ॥ १ ॥ याप्रमाणे ब्रह्मदेवानें एका श्लोकांत रामायण तयार केल्यावर तो श्लोक त्यानें · नारदाला सांगितला. तो एक श्लोक आधारभूत घेऊन त्यावरून नारदानें शंभर श्लोकाचें रामायण तयार केलें. पुढे कांहीं दिवसांनीं वाल्मीकि ऋषीची व नारदाची शरयू नदीच्या तिरावर भेट झाली. तेव्हां वाल्मीकि ऋषि नारदाला झणाले; " नारदा ! सर्वगुणी, पुण्यश्लोक व खरा क्षत्रिय असून धर्मपालक असा कोणी राजा पृथ्वीवर असल्यास त्याचें चरित्र मला सांग." तेव्हां नारद ह्मणाला ऋषि ! आपण ह्मणता असा राजा सांप्रत तर पृथ्वीवर कोणी नाहीं, परंतु पुढे होणार आहे. अयोध्या नगरीचा राजा दशरथ, याला कांही दिवसांनी जो एक पुत्र होईल, तो प्रभूचा अवतार होईल; त्या राजाचें नाव श्रीरामचंद्र होईल; मला ब्रह्मदेवानें त्यापुढे होणाऱ्या श्रीरामचंद्राचें चरित्र एका श्लोकानें सांगितले आहे, तेंच चरित्र मी शंभर श्लोकांत लिहिले आहे. हे वाल्मीकि ऋषे ! या माझ्या रामायणावरून मला असे वाटतें किं, तो श्रीरामचंद्र प्रभु अत्यंत सच्चरित्र असा राजा होईल. सर्व आबालवृद्धांनीं त्याच्या चरित्राचें मनन करावें व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, असे त्याचें उदार चरित्र होईल. तो अत्यंत निर्मल अशा नीतीनें वागेल, पवित्र अशा धर्मानें राहील व सत्य अशा वाणीनें बोलत जाईल, तो रणांत पर्वताप्रमाणें धैर्यानें वागेल, त्याचा ब्राण कधींहि फुकट जावयाचा नाहीं, तो एकपत्नीव्रतानें राहील, आणि आपल्या