पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें] अध्याय ९ वा. १२३ त्तरी त्यांतून जसा गोड रस निघतो, किंवा उत्तम सोनें अग्नींत घातले असतां तें अधिक कसदार होतें, किंवा चंदन घांसला असतां त्याचा जसा परिमल सुटतो, त्याप्रमाणें तुझी कीर्ति चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत जगांत कायम राहील. तूं खरो- खर भक्तशिरोमणी आहेस, तो परब्रह्म आदिपुरुष तुझा सेवक झाला आहे, तेव्हां त्याच्याप्रमाणें तुझी कथा देखील लोकांच्या पातकाचा नाश करील. : " याप्रमाणें डुर्वास ऋषि अंबरीष राजाला आशीर्वाद देऊन आपले आश्रमाला उनिघून गेला. " अध्याय ९ वा. एकादशीव्रताची कथा. १ पुष्पें चोरणारे देवदूत. 6.6 अंबरीष राजाच्या एकादशी व्रताचा एवढा प्रभाव ऐकून जनमेजथ राजा या व्रताविषयींची कथा ऐकण्याच्या इच्छेनें तो वैशंपायन ऋषीला म्हणाला; “ ऋषी ! हें एकादशीचें व्रत कोणी आरंभिलें, व त्या व्रताची उत्पत्ति कशी झाली, हे मला कृपा करून सांगावें.” राजाची ती इच्छा जाणून वैशंपायन ऋषी मोठ्या संतोषानें जनमेजयाला एकादशीच्या व्रताची कथा सांगू लागला, राजा ! पूर्वी कांतीनगरांत सूर्यवंशी रुक्मांगद या नावाचा एक उदार पुण्यश्लोक व धर्मस्थराजा राज्य करीत होता. त्याची श्रीहरीवर एकनिष्ठ भक्ति असून तो नेहमी श्रीहरीच्या भजनपूजनांत मग्न असे. त्याच्याप्रमाणे त्याची स्त्री संध्यावळी, हीहि अत्यंत पुण्यशील असून श्रीहरीची व्रतें भक्तिभावानें करीत असे. त्या रुक्मांगद राजाला धर्मोगद या नांवाचा एक पुत्र होता. तोहि बापाप्रमाणेंच धर्मरत असून कल्पट- क्षालाहि लाजवलि असा उदार होता. त्या राजाचें राज्य मोठें विस्तीर्ण असून राजाचें राहण्याचें कांती शहर अत्यंत सुंदर होतें. शहरासभोवती मनोहर उपवनें असून, तीं अनेक प्रकारच्या सुवासिक पुष्पभारांनी अक्षय्य डबडबलेलीं होती. शहरांतील घरें, प्रशांत व स्वच्छ असून प्रत्येक घरापुढे सडासंमार्जन होत असे. त्या शहरांत शंकराचीं व विष्णूचीं अनेक मंदिरें असून त्यांचे सुवर्ण- कळस दुरून झळकत असत; मंदिरावर लावलेल्या मोठमोठ्या सुंदर ध्वजा वाऱ्याच्या योगानें फडफड उडत असत; कोठें कथा चालली आहे, कोठें पुराण चालले आहे, कोठें हरिभजन होत आहे, तर कोठें शिवमंदिरांत वेद घोष होत आहे, असे त्या शहरांत अक्षय्य चाललेले असे. सारांश राजाप्रमाणे त्याची प्रजाहि धर्मरत होती; यामुळे सर्व प्रजाजन सुखी असून त्यांनां रोगराई, दुष्काळ, व अकालिक मृत्यु हीं मुळींच माहीत नव्हती.