पान:कथाली.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंधू ज्ञानोबा. धाकटे मालक अण्णांहून तेरा वर्षांनी धाकटे. त्यांना शिकण्यात रस नव्हता. तरीही पंढरपुरात ठेवून मॅट्रिक काढली. शेतीत मात्र खूप लक्ष. ते शेती पाहू लागले. एक दिवस अण्णांनी धाकट्या मालकांना विनंती केली.
 "ज्ञानबा, तुमी आता शेतीत चांगले रूळला आहात. आपलं घर खाऊन पिऊन टंच हाय. आपल्या बप्पांना शिक्षणाची किंमत म्हणून त्यांनी आपणाला पंढरपूर, पुण्याला पाठवून शिक्षण दिलं. पण या डोंगरातली कुणब्याची; बलुतेदारांची, वेशीबाहीर रहाणाऱ्यांची लेकरं जाऊ शकतात का शाळंत? शाळा तालुक्याला. तिथला खर्चा लई. कसा परवडावा? देवाने त्यानला बुद्धी दिली तरी ती सर्वांसमोर कशी यावी? त्यांना कोन संधी देनार? मी आजवर या दिवसाची वाट पाहत होतो. पंढरपुरात साने गुरुजींना ऐकलं तवाच ठरवलं की शिक्षण खेड्यात न्यायचं. तुमी आता घराचे मालक. डोंगरातल्या पाथरीच्या देशमुखानं शाळेसाठी वाडा द्यायचा कबूल केलंय. येत्या जूनपासून शाळा सुरू होईल...
 "तुमाला आमी हात जोडून." अण्णांचे वाक्य तोडीत आणि हात धरीत धाकट्यांना हुकूम देतात. तुमी शाळंचं बघा. आमी घर, शेत समदं सांभाळू. फक्त तुमचा मायेचा हात पाठीवर ठेवा."

* * *

 "चंद्रभागा" मालकांचे शब्द जिजीच्या कानावर पडले, जणू युगायुगाने इतकी आर्द्र हाक ऐकू येत होती. त्या शब्दातली माया, ओलावा, जवळीक, जीवाभावाची सखी असल्याचा विश्वास. जिजीला पुस्तके वाचण्याचा नाद होता. पण घरकाम, मुलाची उठाठेव करताना वेळ कसा मिळावा? अण्णांना संस्कृतची खूप आवड. कालिदास नावाच्या कवीने बायको कशी असते, याबद्दल लिहिलेला श्लोक त्यांनी सांगितला होता. जोवर अण्णा गावी राहत तोवर हरेक गोष्ट ते जिजीला सांगत. तिचे मत विचारीत.
 "मी बाई मानूस. मला काय इचारता? मला काय कळतं? चुली म्होरचं कळनार आमाले." असे त्या म्हणत. तेव्हा हा श्लोक त्यांनी समजावून सांगितला होता. बायको जिवाभावाची सखी तर असतेच पण ती सल्ला पण देते. घरचा कारभार तीच पाहते. ते आठवून जिजींच्या फिक्कट ओठांवर हसू उमलले आणि डोळ्यासमोर ती रात्र आली.

९० /कथाली