पान:कथाली.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अहमदपुरास गेल्या तरी लिंबाळ्याहनू सुटणाऱ्या पहिल्या एसटी बसने दूधताकाच्या बरण्या, खवा, तुपाचे डबे, पुरण अहमदपुराला रवाना होई. आपल्या पोरी जिजींमुळे शिकल्या, चार पैसे कमावतात, संसारात सुखी आहेत, याची मनोमन जाणीव धाकट्या काकीला होती. गेल्या साली नितीनच्या हट्टापायी वाड्यात दोन चुली पेटू लागल्या होत्या. प्रत्येकाच्या नावाने शेती वेगवेगळी लावून टाकावी, लेकीना पैसा आडका दागिने देऊन बोळवणं करून मोकळे व्हावे असे अलीकडे धाकट्या मालकांना वाटे. भावजयी जवळ. जिजींजवळ तसे त्यांनी बोलून दाखवले होते.
 "माज्या लेकरांना दोन हात जमीन कमी येऊ द्या. पन माज्या धाकलीच्या लेकरांच्या मनाचा संतोष करा. तुमी लई केलंत माज्या लेकरांसाठी. मालकांनी कायम साळंचा संसार बघितला. तुमी तुमच्या भाबीवरची माया कंदी कमी केली न्हाई. जिजी असे नेहमी म्हणत. दोन चुली मांडल्यापासून जिजी खूप दुखावल्या होत्या. गावी जाऊन धाकटी जवळ राहावे असे सारखे वाटे. पण रमेशची मुले आरती नि अनिल, धाकट्या लेकीची अकरावीतील लेक सुखदा यांना घेऊन राहणाऱ्या जिजींना मनातली इच्छा मनातच ठेवावी लागली. मुकुंद, सुशा गावातच वेगळे राहतात. त्यांनी जबाबदारी घ्यावी असे वाटे. पण मुकुंदाला कोण सांगणार?
 "मंगू लई उशीर केलास ग यायला." डाव्या हाताला सुई टोचलेली. जडावलेल्या उजव्या हाताने लेकीचा हात चाचपीत जिजी बोलल्या. "तू, पावणे, आज्या आलाव. पण तुजे अण्णा अजून आले न्हाईत ग. उगा सोंग केलंय माझं. मी चांगली हाय. तू आलीस. मला लिंबाळ्याला घेऊन चल माय." एवढ्यात धाकट्या काकी धापा टाकीत खोलीत आल्या. जिजीच्या जवळ बसल्या. वाहणारे डोळे. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. "सुधा दोन दिवसांपासून मोठ्या बाई दवाखान्यात हाईत. साधा निरोप नाही देऊ? मुकिंदा तरी होते का इथं?" धाकट्या काकीला सुशा तरी काय उत्तर देणार? तिचे बिऱ्हाड वेगळे. त्या दिवशी रमेशची आरती शाळेतून घरी आली. जिजींची छाती दुखत होती. चेहेरा घामाने थबथबलेला होता. आरतीला पाहताच त्या आमटी गरम करायला उठल्या. पण तशाच खाली बसल्या. आरती लगेच सुशा काकीकडे धावली. सुशाने डॉक्टरांना फोन केला. जिजींना सरकारी दवाखान्यात दाखल केले. रात्र उलटून गेल्यावर मुकुंदा घरी आला.

८८ /कथाली