पान:कथाली.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जमीन. मोठ्याने पंधरा वर्षे बारदाना सांभाळला. वडलांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे धाकट्याचे शिक्षण, बहिणींची लग्न. ही जबाबदारी सांभाळली. मधला भाऊ नोकरी निमित्ताने थेट दक्षिणेत, मद्रासला असतो. धाकटा भाऊ शेतीत रस घेऊ लागल्यावर, अण्णांनी त्यांच्या डोक्यात साने गुरुजींनी पेरलेली कल्पना साकारण्यासाठी शेतीची जबाबदारी सोडली. धाकट्या मालकांनी थोरल्या भावाच्या मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नाची जबाबदारी सहजपणे पार पाडली. मुली शिकू लागल्या. मग धाकट्या मालकिणीने गावातला बारदाना सांभाळला तर, जिजींनी तालुक्याच्या गावी घर करून पोराबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. जिजी, अण्णांचा मोठा लेकं रमेश. बी.ए.ची पदवी घेतल्यावर, धाकट्या मालकांची होणारी धांदल पाहून, पुढच्या शिक्षणाची. वकील होण्याची स्वप्ने बासनात बांधून गावी येऊन शेती पाहू लागला. त्यात स्थिरावला. त्यालाही अठरावीस वर्षे होऊन गेली आहेत. धाकट्या मालकांचा मोठा वकील होऊन औरंगाबादेत हायकोर्टात वकिली करू लागला आहे. अण्णांचा मधला पहिल्यापासून राजकारणात घुसला आहे. धाकट्या मालकांचा धाकटा नितीन शेतीशास्त्रातील पदवी घेऊन चार वर्षांपूर्वी गावात आलाय. नवे ज्ञान, नवे प्रयोग, नवी स्वप्ने, नवे विचार डोक्यात. रमेश आणि धाकट्या मालकांची शेती करण्याची रीत आणि नितीनची नवी पद्धत यांचा मेळ बसेना. रमेशची पत्नी अनुराधा खेड्यातली. दहावीपर्यंत शिकलेली. धाकट्या काकींच्या हाताखाली शेताभाताची देखभाल करण्यात, दूधदुभत्याची उठाठेव करण्यात रमून गेली. चुलत मालत असा भेदभाव या घराला कधी नव्हताच, मद्रासच्या मधल्या भावाच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्या खात्यावर नेमाने जमा होत. तर, शेतीच्या खर्चासाठी लागणारा पैसा बँकेतून उचलता यावा म्हणून मधल्याच्या सह्यांचे कोरे चेकबुक धाकट्या मालकाच्या कपाटात कायम असे. पंचक्रोशीतल्या लोकांना कौतुकाची वाटणारी बाबत नव्या तरुण पिढीला रुचेना. धाकट्या काकीला वाटे की, नितीनच्या बायकोने घरात थोडीफार मदत करावी. राधाकडून शिकून घ्यावे. टीव्ही, फ्रीज, मिक्सर या सारख्या नव्या वस्तू घरात होत्या. राधा त्याचा उपयोग करून घरात लक्ष घालते. तसेच नितीनच्या चित्राने करावे. चित्रा शिकलेली म्हणून गावातल्या शाळेत अण्णांनी तिला घेतले. पण शहरात वाढलेल्या चित्राला घरासाठी वेळ देणे जमेना, शाळा, टीव्ही, वाचन यात तिचा वेळ जाई. धाकट्या काकी आणि जिजी ताटाला ताट लावून जेवल्या. पोरांच्या शिक्षणासाठी जिजी

यती आणि सती/ ८७