पान:कथाली.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकाव्या म्हणून गावची शीव वलांडली. आन शिकल्याबी माज्या चिमण्या व्हयं ग?" ते आठवून सुशीलाला हसू आले. तिने घड्याळाकडे नजर टाकली तेवढ्यात बाहेर ओळखीचा आवाज आला. डोक्यावरचा पदर नीट घेत ती दारात आली. थोरली नणंद मंगलाक्का, डॉ. अजित, त्याची पत्नी डॉ. अनिता आणि जावईबुवा घाईघाईने येत होते. मंगलाक्कांच्या डोळ्यात पाणी आणि प्रश्नचिन्ह. डॉ. अजितने आईचा हात धरून न बोलण्याची खूण केली. आजीची. जिजींची नाडी बघितली. "मामी, कधी ॲडमिट केलं? सकाळी डॉ. प्रशांतचा फोन होता. लागलीच निघालो. प्रशांत बघतोय जणू जिजीकडे. पल्स ठीक आहे." असे विचारीत अजित आपल्या लाडक्या आजीला हलवून जागे करू लागला.
 "आजी, ऊठ, मी अज्या आलोय तुझा. तुझा अज्ज्या, डागदर"
 धक्के मारमारून घट्ट बसलेल्या बंद दरवाजाचे पट करकर करीत उघडावेत तसे जिजींनी कष्टाने डोळे उघडले. नातवाचा मोठ्या पहिल्या वहिल्या नातवाचा हात तिने गच्च धरून ठेवला. खोल गेलेल्या आवाजात विचारले,
 "कंदी आलाव?" नातवामागे लेक, नातसून आणि जावई उभे होते. त्यांना पाहताच जिजींचा हात डोकीवरच्या पदराकडे गेला. पण हाताला सुई टोचून बाटली लावलेली. त्यांनी नजरेने सुशीलाला इशारा केला. तिने त्यांच्या अंगावरची चादर नेटकी केली. डोक्यावरचा पदर नीट केला. जावयांना बसण्यासाठी खुर्ची पुढे केली.
 "लेकीशी मनमोकळं बोला. मी बसतो बाहेर" असे म्हणत जावई बाहेर गेले.
 "सुशा, दोन दिवस झाले ॲडमिट करून जिजीला! साधा निरोप नाही देऊ?" मंगलाक्का काहीशा नाराजीने आणि अजीजीने बोलल्या.
 "मामी, फोन करायचा. इथल्या दवाखान्यात ठेवण्यापरिस लातुरात सोय आहे. घरचे डॉक्टर्स, घरचे हॉस्पिटल." अजितच्या बोलण्यातली नाराजी आणि तळमळ सुशाच्या लक्षात येत होती. पण ती तरी काय करणार? घरात ती एकटीच. मुकुंददादा राजकारण गुंतलेले. कधी इथे तर कधी तिथे. नशीब म्हणून त्या दिवशी गावातच गवसले. एरवी दिल्ली मुंबईच्या फेऱ्यात अडकलेले.
 गेल्या दोन वर्षांत जाधव पाटलांच्या घरातली चलबिचल बाहेरच्यांच्या लक्षात आली नसली तरी घरातील प्रत्येकजण अस्वस्थ असे. तीन भावांची एकलगट

८६ /कथाली