पान:कथाली.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'जिल्हा भूषण' असे अनेक पुरस्कार अण्णांना मिळाले आहेत. खादीचे धोतर, खादीचा कोट, पायात गावातल्या चांभाराने शिवलेल्या जाडजूड चपला, गळ्यात तुळशीची माळ नि कपाळाला गंधाचा टिळा. अण्णा अद्याप आले नाहीत हे पाहून सुशीला अस्वस्थ होत होती. जिजींकडे पाहताच तिचे मन नितांत मायेने भरून आले.
 या घरात येऊन पंधरा वर्षे होऊन गेली आहेत. अण्णा आणि जिजींना अलग बसून बोलताना तिने कधीच पाहिलेले नाही. अण्णा मुक्कामाला कायम डोंगरातल्या पाथरीच्या शाळेत असतात. धाकट्या काकी सांगतात की, चाळीस वर्षात अण्णा मुक्कामाला कधीच लिंबाळ्यात आलेले नाहीत. अशात तालुक्याच्या खेपा वाढल्या आहेत. जिजीही गेल्या पंचवीस सव्वीस वर्षांपासून तालुक्याला अहमदपुरात राहतात. मुलामुलींच्या शिक्षणासाठी घर केले आहे. भाकरी घालायला जिजी. इथले शिक्षण खूप चांगले आहे. जिजींच्या दोन्ही लेकी, धाकट्या ज्ञानोबा काकांच्या लेकी सगळ्याजणी खूप शिकल्या. नोकरी करू लागल्या. डॉक्टर होऊन दवाखाना थाटला. साऱ्याजणी आपापल्या घरी सुखात आहेत. शिक्षणासाठी घरातल्या मुलामुलींना शहरात खोली करून ठेवावे, असे मद्रासला असणाऱ्या मधल्या काकाजींनी सुचवले. "आई माय! खोली करून पोरींनी अभ्यास बी करायचा नि भाकरी बी थापायच्या. मन कसं लागल सिकण्यात. मी हाईन लेकरांजवळ. मालक बाहीरच्यांसाठी साळा काढतात. म्या माजी नातुंड, लेकरं शानी करीतन." तेव्हा जिजींनी ठणकावून उत्तर दिले होते, असे धाकट्या काकी सांगतात.
 "गडी मानसांची बात येगळी. बंदा रुपया असतात त्ये. शिकण्यासाठी कुठबी ऱ्हाईले तरी घरच्यांच्या जिवाला घोर नसतो. पण पोरीची बात येगळी. काचेचा जीव. जरा धका लागला तर तडा जानार. आमच्या येळची बात न्यारी. शिकलेल्या मालकाला बिन शिकलेली मालकीण चालायची. आता शिकलेल्या पोरांना शिकलेली बायको लागती. "पोरींनी शिकायाचं हवं" जिजींचे उधारीचे नव्हे तर रोखीचे बोलणे, माहेरवाशिणी आंब्याच्या दिवसात गावाकडे एकत्र जमत तेव्हा जिजी काहीशा अभिमानाने हसत हसत सांगत.
 "तुमचे अण्णा डोंगरातली, गावच्या शिवे बाहीरची, गरिबाघरची लेकरं शिकावीत म्हणून झटतात. त्या पायी घरदार समदं सोडलं. मी बी घरच्या लेकी

यती आणि सती/८५