पान:कथाली.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले. आत्याबाई लई मायेच्या. बाकी बाया म्हणायच्या की पोरीची वटी भरा. पन आत्याबाई म्हनंत "पोर लहानगी आहे. जाऊंदेत चार सहा महिने. मंग हाईच जलमभरचा उटारेटा". त्या दिवाळीला येताना मालकांनी खोलीत लावायं अ आ ई चा तक्ता आनला. एक दोन आकड्यांची बुकं आनली. पयल्या भेटीतच त्यांनी जत्तावून सांगितलं होत की, मी शिकायाच हवं. मला बी लिहाय वाचाय आवडायचं. साने गुरुजीचं श्यामची आई पुस्तक तर तोंडपाठ होतं त्यांचं..मी बी करमलं न्हाई की त्येच हाती घेऊन बसे. पुस्तकं वाचायचा नाद लागला. त्यांत पोरं बी झाली लवकर. चार पाच वरिसं, लई छान गेली. शेवटची परीक्षा जवळ आलेली. चार दिस सुट्टी घेऊन ते गावी आले. आणि दुसऱ्याच दिशी मोठ्या बाप्पांना. शेतातून घराकडे येताना पान लागलं. धा चा आकडा डोकीवर असलेला नागोबा. घरी आनेस्तो तर काहीच उरलं नव्हतं. मग कुठलं पुणं नि काय. पुन्ना पुन्याला ते गेलेच न्हाईत. मी तिसऱ्यांदा मुकिंदाच्या वेळी गरवार होते.
 आत्याबाईच्या कपाळावरचा कुंकवाचा ठसठशीत टिळा पुसला गेला. डोळे नि चेहेरा कोरड्या हिरीसारखा फक्क उदास. जिजा ग, अशी सादही बंद झाली. न्हाणी लगतच्या अंधाऱ्या खोलीत त्यांनी बस्तान टेकवलं ते कायमचंच!"
 जिजींच्या मिटल्या डोळ्यांसमोर आत्याबाईंचा बिना कुंकवाचा भेसूर चेहेरा आला. त्याचं अंग घामाने डवरून गेले. अंगावर सरसून काटा आला.
 जिजींचे घोरणे वाढतंच चालले होते. त्यांचे कपाळ घामाने ओले झाले. नि आकडा यावा तसे अंग थरथरून ताठरले. शेजारी बसलेली सुशीला दचकली. तिने घाबरून समोरच्या मॉनिटरवर नजर टाकली. त्यावरच्या रेषांची नागमोडी चाल सुरू झाली. तिने क्षणभर निःश्वास टाकला आणि ती सिस्टरना विनवू लागली. "सिर, डॉक्टरना बोलवा ना. जिजींचं घोरणं काही वेगळंच वाटतंय आणि आता खूप थरथरल्या. घामपण पाहाना केवढा आलाय." डॉक्टर आले. त्यांनी तपासले.
 "वहिनी, आजचा दिवस अवघड आहे. मुकुंददादा इथेच आहेत ना? आणि अण्णा कसे आले नाहीत अजून? त्यांना निरोप गेला असेल ना? अजितला कळवलंत ना? तो नाराज होईल नाहीतर माझ्यावर. वहिनी, थोडी घाईच करा." डॉक्टरांनी सांगितले. दवाखान्यातले सगळे डॉक्टर्स, नर्सेस घरातल्यागत जवळचे आहेत. भवतालच्या परिसरात अण्णांबद्दल अपार आदर आहे. 'दलित सेवक',

८४ /कथाली