पान:कथाली.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दारं नीट लावून घे. अडसर घालून झोप." रोशला सांगून सविता बेडरुममध्ये गेली. नोटस् काढता काढता कधी डोळा लागला ते कळलं नाही.

* * *


 "आई उठता ना? लई दाट झोप लागली व्हती. म्या रातच्याला तुमाला उठवून झोपाया लावलं. आठवतं का? चूळ भरून पयला चा घ्या बरं!" रोशने चहा टीपॉयवर ठेवला.
 आज पहिला शनिवार. संध्याकाळी नातवंडं आज्जूला भेटायला नाचत येणार रात्री मुलंही येतील. आज बाजारात रोशला पाठवायला हवं. तीन तऱ्हेचा चिवडा करायला हवा. ती पटकन उठली नि चूळ भरायला बेसिनकडे वळली.
 "रोश, पाठकोरा कागद घेऊन ये", असं म्हणत सविता आत झोपायच्या खोलीत गेली. समोर अरुणचा हसरा चेहरा. फोटो निर्जीव. पण हसणं अगदी जिवंत. फोटो पाहून सविताचा जीव आतून कासावीस झाला. पाहता पाहता त्याला जाऊन साडेसोळा महिने झालेत.
 तो दिवस...
 "सावी, मला कसंतरीच होतंय. उठ." असं म्हणत अरुणनं सविताला उठावलं होतं. सविता ऋजुताला फोन करू लागली तर त्यानं अडवलं.
 "घाबरेल माझी लेक. उद्या सकाळी." असं म्हणेस्ता तो खाली कोसळला. ऋजू, अश्विन आले ते त्यांची अँब्युलन्स घेऊन. तात्काळ त्यांच्या एन फोर मधल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पहिल्यांदाच आलेला हार्ट ॲटॅक. पण सिव्हिअर. काही समजायउमजायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. दुपारी वाचा गेली. खुणांनी घरी न्या असं तो सांगे. खरंतर ऋजुता-आश्विनचा दवाखाना. हॉस्पिटल खाली नि वर घर, पण ते लेकीचं. आपलं घर ते आपलं. शेवटी घरी आणलं. निशिकांत आणि संगीता मुलांना संगीताच्या आईकडे ठेवून झोपायला आले. रात्री अरुणला शांत झोप लागली. सकाळचा चहा घेऊन सावी गेली, तर ती झोप अखेरची ठरली होती.
 त्याच्या मृत्युपत्रातील इच्छेनुसार त्याचा देह मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी दान केला. त्याचा देह ठेवलेली ट्रॉली शवागरात नेऊन दरवाजा बंद केला तेव्हा सवितानं अत्यंत आक्रमक निष्ठूरपणे चेहरा स्थिर

७६ /कथाली