पान:कथाली.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतिहास, मानवंशशास्त्राची पुस्तकं उजव्या बाजूच्या कप्यात. मध्ये लिखाणासाठी टेबल. त्यावर प्रकाश येईल असा दिवा. टेकावंस वाटलं तर एक आराम खुर्ची, या सगळ्या सोयी करून देणारा आता कुठे उरला होता?
 सवितानं देविप्रशाद चटोपाध्यायांचं 'लोकायत' संदर्भग्रंथातून घेतलं. स. रा. गाडगीळांचं मराठी भाषेतलं लोकायत, अ. ना. साळुंकेच 'चार्वाक' ही पुस्तकंही टेबलावर ठेवली. विद्यापीठात चार्वाक दर्शनावर दोन पिरिअडस् घ्यायचं कबूल केलयं. निवृत्त होऊनही साडेचार वर्षे होऊन गेलीत. तिच्या मनात आलं, मनातल्या या कप्प्यावरची धूळ झटकायला हवी.
 "आई, आदी पोलीचा चिवडा खाऊन घ्या. चा बी टाकते. आंगूळ करून मगच बसा अभ्यासाले." सविता संध्याकाळीही आंघोळ करते. अभ्यास वा वाचायचं असेल तर नक्कीच करते. रोशला सगळं माहीत झालंय.
 रोशनं भरपूर आलं घातलेल्या चहाचा गंध नाकाला स्पर्शेून गेला. चहाची चव घोट घेण्याआधीच जिभेवर दरवळली. प्रत्येक घोटासोबत तिचं मन भूतकाळात रेंगाळू लागलं.
 फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील ते फुलपंखी. भरजरी दिवस, प्रत्येक दिवस जणू नवा. अकरावीपर्यंतचं शिक्षण तळोद्यासारख्या सातपुड्याच्या बारक्या गावात झालं. पण पुण्यातील प्रत्येक संध्याकाळ गजबजलेली. मोगरा नाहीतर जुईच्या गजऱ्यांसारखी झुलती असायची. फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड सदैव बहरलेला. डेक्कनकडे जाणारे तरुणांचे घोळके एकमेकांना मारलेले टोमणे. कधीमधी गोड धक्के भवताली स्वप्नांची झाडं होती. त्या सुंदर आंठवणींनी सविताचे डोळे पाणावले.
 तिनं देविप्रसादांचे लोकायत,उघडलं. ती त्यात पूर्णपणे बुडून गेली. संध्याकाळ दाटून आली होती. कुकरच्या शिट्टीनं ती लोकायतमधून बाहेर आली. आंबेमोहोर तांदुळाच्या वासानं भूकही जागी झाली. तिनं उठून कांद्याचं पिठलं केलं. रोशनं गरम भाकरी पानात टाकली. तिनं जेवायला सुरुवात केली.
 "रोश, आज मला रात्री दूध नको देऊस. मी जरा नोटस् काढते. तुझं झालं की, ब्रुनोला दूधभाकरी घाल नि कंपाउंडच्या दाराला कुलूप लावून त्याला मोकळं सोड.

उगवते पिंपळपान /७५