पान:कथाली.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षे उलटून गेली तरी भारतात परत येण्याचं त्याचं आश्वासन दूरच जातंय. अर्थात ते अपेक्षितच असतं.
 "ममा, मी नक्की इंडियात परत येणार तू उगाच काळजी करतेस. आय लव्ह माय कन्ट्री. बिलीव्ह मी. पैशाच्या मोहानं मी इथे सेटल होणार नाही गं." असं सांगणाऱ्या सुजीतनं लग्नही तिकडेच जमवलं.
 "ममा, ती बंगाली आहे. म्हणजे भारतीयच की. जसा तुझा जावई अय्यर, तशी एक सून बंगालीन. नंदिता आता मराठी शिकतेय. आम्ही सेटल होणार महाराष्ट्रातच. आणि निशीभैयाला ही न्यूज तूच दे. ऋजुताच्या वेळीही तूच त्याला सांगितलं होतंस ना? आणि"
 सविताच्या नजरेसमोरून गेली सहा-सात वर्षे झरकन सरकून गेली.
 "आज्जू बोल ना गंs" - तिकडून मुनू बोलत होती.
 "हे बघ मुनू, उद्याचा रात्रीचा मुक्काम आज्जूकडेच. परवा रविवार आहे ना? तू, किट्टू, आत्याचे देवा, दिगू सगळ्यांचा उद्या मुक्कामाला इथेच. रात्री 'तारे जमीपर'ची कॅसेट आणू या का? रविवारच्या रात्रीचे जेवण 'खैबर'मध्ये. उद्या रात्री मी मस्तपैकी खिचडी करते. रविवारी धम्माल करू. रात्री सुजीतकाकाला आपण कशी मज्जा केली ते फोन करून मिटक्या मारत सांगू. म्हणजे त्याला पण भारतात लवकर यांवंस वाटेल. काय? मी उद्या तुझ्या मामाला नि आत्याला करते फोन." असं आश्वासन देऊन सवितानं फोन खाली ठेवला.
 "आई, चाय करू? रातच्या दोन पोल्या हायेत. त्या बुरनोला होतील. तुमाले नाश्त्याले काय करू?" रोशने विचारले.
 "पोळ्यांचा कुसकरून चिवडा कर. आपल्या दोघींना होईल आणि संध्याकाळी बाजारात जाऊन ये. उद्या घर भरून जाईल." रोशला सांगतानाही सविताचा आवाज फुलून आला आणि ती तिच्या अभ्यासाच्या खोलीत गेली.
 अरुणने ही खोली खूप छान लावून दिलीय. तो नेहमी म्हणे, सावी, शिक्षकाचं धन म्हणजे त्याची पुस्तकं! डाव्या बाजूच्या आडव्या भिंतीत संदर्भग्रंथांचं कपाट केलं होतं. त्यात संस्कृत, उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोष, संस्कृतिकोष आणि अनेक संदर्भ ग्रंथ नेटकेपणाने लावलेले होते. त्याला ही पुस्तके वाचण्याचा नाद होता. कथा, कादंबऱ्या, काव्य, ललितनिबंध यांचं कपाट वेगळं. सावीची राज्यशास्त्र,

७४ /कथाली