पान:कथाली.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उगवते पिंपळपान

 "ए आज्जू, मला तुझी लईलईच आठवण येतीय. लई लई म्हणजे खूप खूप. आज्जू, आम्हाला रा. र. बोराडे या ग्रामीण लेखकांचा धडा मराठीच्या पुस्तकात आहे. आम्ही मैत्रिणींनी ठरवलंय की, अधूनमधून ग्रामीण भाषेतच बोलायचं. अग, बाई सांगत होत्या की, आपल्या देशातील सत्तर टक्के लोक खेड्यात राहतात. त्यांची भाषा आपल्याला यायलाच हवी ना? तू ये ना इथे दोन दिवस राहयला. फोनवरून मुनू बोलत होती.
 "उद्या शनिवार आहे. तू नि किट्टू या ना इथे. मी मॅगी आणून ठेवते. काय? धम्माल करुया."
 "आज्जू, उद्या फर्स्ट सॅटरडे आहे. मॉमला सुट्टी कुठे असते? त्यातून किट्टूची बालवाडी एकला सुटणार, मग त्याला दूध पाजवून झोपवायचं. हे कोण करणार? मीच ना? तू तुझ्या मुलाला निशीबाबाला खूप लाडवून ठेवलंयस हं. बघ ना, बाबा दौऱ्यावर गेला की, आठ आठ दिवस तिकडेच!"
 सविताला मुनूच्या बोलण्याचं खूप हसू येत होतं. मनाली आता सहावीत गेलीय. मुलं आपल्याला मिळालेल्या नव्या माहितीचा किती सहजपणे वापर करतात ना? खरं तर सविताला तिच्या एवढ्या मोठ्या ऐसपैस घरात खूप एकटं एकटं वाटतं. निशिकांत सिडकोत त्याने बांधलेल्या घरात राहायला गेल्यावर तिनं 'स्वगत'चा वरचा मजला बंद करून ठेवलाय. खालच्याही तीन खोल्या बंद करून ठेवल्यात. वरच्या मजल्यावर सुजीतची पुस्तकं नि संसार पॅक करून ठेवलाय. चार

उगवते पिंपळपान /७३