पान:कथाली.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सतत लिहिणारा, वेगवेगळ्या कॉन्फरन्समधून समाजविज्ञानावरची टिपणे अभ्यासपूर्वक सादर करण्यासाठी देश विदेशात भ्रमंती करणारा माधव पार्किन्सनने घरात पडून आहे. त्याच्यासाठी. केवळ त्याच्या इच्छेखातर तिने परदेशात जाण्याची तडजोडही केली असती. पण माधवच ठाम होता. त्याच्याजवळ तिने अक्षरांचे तक्ते दिले होते. तो त्यावर थरथरणाऱ्या हाताची बोटे ठेवून बोले. दे...ह... दा... न... ही अक्षरे गेल्या महिन्यात येऊन, पंधरा दिवस राहिलेल्या निरंजनला सतत दाखवत असे. निघताना निरूची पावलेही जडावली होती. डोळे भरून आले होते.
 रंजनाला अलीकडे वाटे, मी तरी किती मन दगड करू? पण ते जमायलाच हवं, असं ती पुन्हाः पुन्हा मनाला बजावी. मोनिकाच्या आग्रहामुळे या वेळी ती डायग्नोस्टिक सेंटरला. सर्वात्मक आरोग्य तपासणी केंद्रात जाऊन आली होती. आणि तिला शुगर आणि लो ब्लड प्रेशर असल्याचे लक्षात आले. निघताना लेकीने तीनतीनदा बजावले होते. पर्समध्ये कायम मारी बिस्किटांचा पुडा ठेव, चार चार तासांनी काही तरी खा. रोज तिकडच्या संध्याकाळी म्हणजे आपल्या सकाळी तू फोन करायचा आणि तिकडच्या रात्री मी करीन. आणि रोज सकाळी आठ नऊच्या सुमारास तिचा फोन येई नि रंजना न चुकता रात्री दहा वाजता तिला फोन करून झोपत असे.
 मुलगा नि मुलगी दोघेही सारखेच प्रेम करतात. पण 'स्त्रीला असलेलं मातृहृदय लेकीला उपजत असतं. त्यासाठी मातृत्वाच्या कळाच सोसायला हव्यात असे नाही. उगाच का तुकोबांनी म्हटलंय. कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे. पण नव्या आजारांनी तिच्या अंतर्मनाचा टवका उडालाय. तो सतत अस्वस्थ करतो. समजा माझं काही झालं तर माधवचं कसे होणार?
 तिला ती निरंजनकडे यूएसएला गेली तेव्हाचा प्रसंग आठवला. अनाथांच्या तिथल्या वृद्धाश्रमाला भेट देतानाचा. त्या दिवशी नव्यानेच एका अतिवृद्ध बाईला त्या दिलासाघरात आणले होते. ते वृद्धांचे दिलासाघर एक स्वयंसेवी संस्था चालवते. ही मंडळी रोज अशा वृद्धांचा आत्मीयतेने शोध घेतात. ती वृद्धा एका सार्वजनिक बागेत भुकेने व्याकूळ होऊन एका बाकावर अर्धग्लानीत पेंगुळली होती. तिच्या मुलांनी बहुदा तिला या बागेत आणून सोडले असावे. अशी न सांभाळता येणारी अतिवृद्ध माणसे. हो माणसेच की, किंवा वेडी बागडी माणसं

हे ईश्वरा/७१