पान:कथाली.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "सरचा काय हाय? दोनीबी लेकरं मैनामैना राहून परत यू.एस.ए.ला ग्येली की हो. यासाठी तरी चार लेकरं हवीत. भावाला भाऊ भैनीला भैन". इतक्यात पुन्हा फोनची रिंग वाजली आणि रंजाची सुटका झाली.
 सगळ्या भाज्या घातलेली गरगटी खिचडी खाऊन माधव डोळे मिटून पडलाय. कॉटच्या अलीकडच्या बाजूला तिने गादीखालून लोड लावला नि शिवाय खुर्चीही ठेवली. रंजनाच्या मनातलं भिरभिरं पुन्हा गरगरू लागलं. तिला निरजचा आग्रह आठवला. म्हणायला यूएसए पण रिकाम्या माणसासाठी माशामारी. मोनिकाच्या पहिल्या बाळंतपणासाठी ती हौशीने गेली होती. चक्क आजारपणाची रजा घेऊन कॅनडात गेली होती. माधव नुकताच निवृत्त झाला होता. त्याने ओरडा केला होताच! "घे की बिन पगारी रजा. काय करणार आहेस पैसे साठवून? मुलांचे शिक्षण केलं ती कमावती झाली. लेकीसाठीच चालली आहेस ना? तिकीटही तिनेच पाठवलंय." पण तिने त्याचा ओरडा कानाबाजूला टाकला होता. मोनाचं बाळ एक महिन्याचं झालं नि मोना लगेच कामावर जाऊ लागली. सौम्य दोन महिन्यांचा होताच सुदेशने त्याच नांव नोंदवलेल्या चाइल्ड केअर सेंटरच्या बाई सकाळी सात वाजता कार घेऊन येत सौम्यला घेऊन जात. तिकडे शेजार ना पाजार. मोना सुदेश येताना सौम्यला घेऊन येत. रंजनाने रात्री जेवताना सौम्यला घेऊन येत. रंजनाने रात्री जेवताना जाहीर करून टाकले की, लवकरात लवकर भारतात जाणार आणि ती परतलीही.
 कॅनडात भारतीयांची संख्या बऱ्यापैकी आहे. मराठी कुटुंबेही अनेक आहेत. महिन्यातून तिसऱ्या रविवारी एका भल्यामोठ्या मंदिर कॉम्प्लेक्समध्ये सर्वजण जमतात. मंदिर मस्जिद, गुरुद्वारा, जैन, बौद्ध सर्व मंदिरे एकेका भागात. भोवती प्रार्थनेसाठी शेड आणि मागच्या बाजूला मोठा हॉल. त्यात स्वयंपाकघर, धुण्याची मशिन्स, जिम्, सगळे सगळे. एका रविवारी तीही तिथे गेली होते. अनेक वृद्ध भारतीय महिला आता वृद्धावस्थेत मुलांसह एकाकी जीवन जगणाऱ्या किंवा जगणारे. सगळ्यांची नाळ भारतात पुरलेली. कुणीही नवा भारतीय आला की, त्याच्या भोवती सगळे गोळा होत. गाव, नाते, कॉलेज यांच्या माध्यमातून पदराला पदर जुळे नि मग त्यांच्या मनातली वेदना बोलती होई. तेव्हाच तिने मनोमन ठरवून टाकले होते की मुलं तिकडे सेटल झाली. स्थायिक झाली, तरी माधव व तिने कायमचे तिकडे जायचे नाही. अगदी मनात गोंदवून ठेवले होते. दोन वर्षांपासून

७० /कथाली