पान:कथाली.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाक ऐकून माधवचा हा पार्किन्सन कमीही होईल. ठेवू बेटा. नीट राहा. काळजी घ्या. चंदाला माझे हॅलो सांग."
 फोन ठेवून ती परत माधवच्या खोलीत डोकावली. त्याचा डोळा लागला होता. त्याचा फिजिओ थेरेपिस्ट अंगाला मालिश करीत होता. त्याची ट्रिटमेंट संपण्याची वाट पाहत त्याला चांगली पुस्तके वाचून दाखवणारी वल्लरी थांबली होती. रंजनाने मालूला चहा करायला सांगून सर्वांना द्यायला सांगितले आणि ती नव्याने हाती आलेले 'प्रकाश वाटा' हे पुस्तक उघडून बसली. माझ्या जीवनातला प्रकाश आता हरवला का? पण नेहमीच जीवनात प्रकाश झिरपत राहील, अशी अपेक्षा का करावी मी? तिला स्वतःचे शिकवतानाचे भरगच्च तास आठवले. वीर सावरकरांची कविता शिकवतांना अक्षरश: शब्दांत त्याचे संदर्भाचे धागे उकलण्यात ती बुडून जाई. मग कवी गोविंदांचा संदर्भ येई.

'मृत्यू म्हणजे वसंत माझा
मजवरती फुलणार हो
सुंदर मी होणार आता,
सुंदर मी होणार!'

 मग पुन्हा पु.लं.चे दु:खाचे देखणेपण उलगडून दाखवणारे नाटक. मृत्यु समोर आला, तरी त्याचे सहजपणे स्वागत करण्याची किमया ती विविध तऱ्हेने मुलांसमोर मांडत असे. आणि आज?
 रंजनाच्या अंगावर सरसरून काटा आला. तिने माधवकडे पाहिले तो अगदी हलक्या आवाजात घोरत होता.
 "ताई कधींचा चा ठेवलाय. गार झाला असंल, म्हणून गरम करून आणलाय. लगी लगी घ्यावा! काकांसाठी पातळ गरगटी खिचडी करू! त्यात मेथी, बटाटा, कोथिंबीर, बारीक चिरून टाकते." गंगाने समोर केलेला कप तिने हातात घेतला. "माझ्यासाठी ज्वारीची भाकरी नि मिरचीचा खर्डा करायचा," असे सांगून ती चहाचे घोट घेऊ लागली.
 "काय करताहात रंजाजिजी?" असे म्हणत शेजारच्या बंगल्यातली रमाभाभी आली. "म्या बी घेईन चा. तुमचा तुलसी, आद्रक घातलेला चा लई छान लागतो. माय मला बी आन चा." असे म्हणत तिने समोरच्या खुर्चीवर दनकन ठाण मांडले. ही खुर्ची तशी ऐसपैस आहे.

हे ईश्वरा/६९