पान:कथाली.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गळ्यात लहान नॅपकीनला लाळेऱ्याला बांधतात तसे बंद बांधले आहेत. ते बंद गळ्यामागे अलगद बांधले.
 माधव हळव्या नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. मन घट्ट बांधून ब्रशवरची पकड घट्ट करीत दातांवर फिरविण्याचा प्रयत्न करू लागला. वेल डन, वा छान असे म्हणत रंजना चहाची किटली व कप ठेवलेला ट्रे घेऊन बाहेर आली टीपॉय समोर ओढून त्यावर ट्रे ठेवला आणि कपात चहा ओतू लागली. वाफांसोबत आद्रक नि अंगणातील गवती चहाचा फक्त गंध माधवलाही जाणवला. त्याने रंजनाकड़े तृप्त नजरेने पाहिले.
 माणसाला कसलाही शारीरिक आजार झाला; तरी मन कसे क्षणोक्षणी लवलवत असते. आयुष्याचे तऱ्हेतऱ्हेचे गडद, फिकट, झाकोळलेले, फुललेले हजारो प्रसंग, क्षण मनात फिरत राहतात आणि म्हणूनच बरे आहे. आजार सहन करण्याची ताकद नकळत येते. रंजूने दिलेल्या चमचा चमचा चहाची चव मनभर. अंगभर पसरतांना त्याचे मन भरून आले. उजव्या थरथरत्या हाताने त्याने रंजनाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न केला.. नकळत रंजनाचे डोळे भरून आले. तिने नॅपकिनने माधवचे तोंड पुसले. त्याला आवडणाऱ्या बडीशेप जेष्ठमधाची चिमूट त्याच्या जिभेवर ठेवली.
 इतक्यात फोन खणाणला.रंजनाने धावत जाऊन तो उचलला. "अैय्यु मी नीरू बोलतोय. इथे न्यूयॉर्कला पोचलोय खरा, पण सतत तुमची आठवण येते. मन अस्वस्थ होतं. दिवस ऑफिसमध्ये कसा जातो ते कळत नाही. पण इथे घरी आलो की खूप उदास होतो मी. चंदा मग म्हणतेच, कशाला दर दोन वर्षांनी जातोस रे? मोना इथून जवळच आहे. आईबाबांनी यावं की इथेच. मग तिच्या ममा पपांचं उदाहरण. अैय्यु कराना विचार. प्लीज." निरू पलिकडून नेहमीसारखा अजीजीने आग्रह करतोय.
 'बेटा तू आमची काळजी नको करूस, जगू, सदा रोज येतात रे. आणि हे बघ गावाची आणि देशाची सीमा ओलांडताना इथली नाती, बंध, काळज्यांचं गाठोडं, पिंपळावर बांधूनच पुढे जायचं असतं. बाबा बरे आहेत आणि हे बघ तू पाहातोस ना? बाबांची परिस्थिती कुठे नेण्यासारखी आहे का? आम्हाला तिकडे नेण्याचे स्वप्न प्लीज पाहू नकोस. चंदासारखी देखणी बायको मिळाली आहे. आता आम्ही आज्जू म्हणणाऱ्या नातवंडाची वाट पाहतोय. कुणी सांगावं? कदाचित पिल्लाची

६८ /कथाली