पान:कथाली.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हे ईश्वरा

 रंजना फोनवर लेकीशी बोलत होती. बोलता बोलता तिचे लक्ष दाराकडे गेले आणि फोन तसाच टाकून ती धावली आणि माधवला सावरले. वैतागाची निष्पर्ण लहर अंगभर थरथरून गेली. तिने माधवचा जड देह तोलून, त्याला कॉटवर नेऊन बसवले.
 "माधव अरे हाक मारायचीस. तुला कॉफी हवीय का? की भूक लागलीय? राजा, नको रे धडपडूस. बरं तर बरं, माझं लक्ष गेलं, नाहीतर काय केलं असतं रे मी?" असं गोडीने समजावीत नॅपकीनने त्याचा चेहरा पुसला.
 म...म... माधव वाकड्या मानेने काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होता.
 "हो रे राजा कॅलगरीहून मोनिकाचाच फोन होता. ती आणि आनंद सुखरूपपणे कॅनडाला जाऊन पोचलेत. थांब तुझ्या कॉटचा डोक्याकडचा भाग थोडा उंच करून देते आणि लिंबू मध पाणी आणते. सातच वाजताहेत तू काही खाणार आहेस का? की मारीची बिस्किटं आणू?"
 रंजना धावत्या चालीने स्वयंपाकघरात गेली. टूथब्रशवर पेस्ट घालून, गरम पाण्याची छोटी बादली घेऊन आली. कॉटचा डोक्याकडचा भाग जरा वर करून माधवला बसते केले. त्याच्यासमोर प्लास्टिकचे गोलाकार टोपले ठेवले.
 "आणि हे बघ उजवा हात थोडा स्थिर ठेवून ब्रशने दात घासायचा प्रयत्न कर. नाहीतर मी आहेच. कालचा प्रयत्न छान जमला होता." असे म्हणत तिने माधवच्या हातात ब्रश दिला. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्याच्या

हे ईश्वरा/६७