पान:कथाली.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माया यायची. जाताना चार दोन रुपये हाती देऊन जायची. त्या रातला मायनं लईच मारलं व्हतं. रातभर बाहेर ठेवलं होतं. बाप दारूत धूत. बापाच्या दारातून रातच्यापारी, डोंगरातल्या वडगावातून ती दगडगोटे तुडवीत चालू लागली. पहाट होईतो डोंगर पहाट होईस्तो पार झालावता. एक बरा रस्ता आला. ती चालत हाईली. एस्ट्या जातयेत होत्या. एका दादाप्याला तिनं भीत भीत ईचारलं. ती परळीच्या रस्त्यानं जात होती. विरुद्ध दिशेने जाणारा रस्ता परभणीकडं जाणारा होता. ते ऐकून तिला धीर आला. ती झपाझपा चालू लागली.
 आता त्याला बी दोन इसावर चार वरिसं झालीत. विमला पन खर्चली. तिची याद कशी बुझणार? तिनंच... मीराताईच्या सावितरी संवस्थेत आनलं. हितं येऊन पन लई लईच वरिसं झाली.
 बारकूमावशी स्वतःच्या वयाचा हिशेब मांडू लागल्या पण तो जमेना. इतक्यात गचकन हादरा बसून रिक्षा थांबली.
 समोर भलीमोठी गर्दी जमा झाली होती. सचिन्याची मोटारसायकल आधीच पोचली होती. रिक्षा थांबताच चार सहा विधवा बाया रडत भेकत तिच्याजवळ आल्या. तिला ओढत घरात नेलं. भामाक्काच्या शेजारी बसवलं. समोर नवन्याचं मढं. तो खंगलेला चेहरा तर कधीच न पाहिल्यासारखा. एका म्हाताऱ्या रांडव बाईनं तिच्या कपाळावरचं कुंकू फरफाटून टाकलं. हात जमिनीवर हापटून बांगड्यांचे तुकडे केले. एकीनं गळ्याला हात घातला. तशी बारकामावशी ओरडल्या.
 "ए, हात नगं लावू माज्या डोरल्याला. म्या हौशीनं कस्ट करून सोन्याचे मणी त्यात वोवले हाईत. त्या दादाप्याच्या... मालकाच्या मढ्यावर घालाया काढून देते चार काळं मनी. आपल्यात रांडव बाई नाकात चमकी घालती. तिला बी हात लावायचा न्हाई." असे म्हणत बारकामावशीने डोरल्यातले चार काळे मणी त्या म्हाताऱ्या बाईच्या हातावर ठेवले. नि कमरेची झीप लावून कमरेला चंची अडकवली. नि त्या खाली मान घालून बसल्या.
 पंधराव्या दिवशी बारकूमावशी रिक्षातनं उतरल्या नि मीराताईंच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. मोकळं कपाळ. गोंदल्याची हिरवी रेघ आणि खालचा ठिपका ठसठशीत दिसत होता. हातात काचेच्या दोन दोन जांभळ्या बांगड्या. अंगावर जुनकट लुगडं.

कुकवाला आधार, फक्त मेणाचा!/६५