पान:कथाली.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'मालकाच्या' या शब्दावर जोर देत किंचित हसत नयनाने सांगितले.
 बारकामावशीने पाहिलं. समोर अनोळखी पोरगा होता. सचिन या नव्या वयस्क काकीकडे पाहू लागला. झटकन पुढे होऊन पायावर डोकं ठेवलं.
 "काकी, मोठे काका लई सिरियस हाईत. लई वरिसांखाली तुमाला घराबाहीर काढलं. त्याचा पस्तावा व्हाया लागलाय. तुमच्या नावाचा ध्यास घेतलाय...येकदा बोलायचं... पाहायचं म्हणतात. तवा लवकीर चला. मी मोटारसाईकल घेऊन आलोया. रिक्सा करावी लागेल. नेकनुरा अल्याडच्या उजवीकडं गेलेल्या रस्त्यानं सात किलोमीटरवर देवगाव आहे. मी आहेच बरुबर. रिक्षा घेऊन येतो. लवकर आवरा." तो पोरगा सांगत होता.
 बारकामावशीला क्षणभर काहीच सुचेना. भान हरपल्यागत झालं. नवऱ्याचा चेहरा पण आठवेना. पण आतून... अगदी आतून न सांगता येणाऱ्या सुखाची लाट क्षणभरच अंगावरून गेल्यासारखं वाटलं. जावं की नाही असाही प्रश्न पडला. पण पुन्हा मनात आलं... त्याचं वय पन लई चढलेल असंल. आन् लई सिरियस हाय म्हनतात, तवा गेलेलंच बरं!
 "ताई यावं का जाऊन?" बारकामावशीनं मीराताईला विचारलं आन् त्या आत गेल्या. गेल्यासाली नैनाताईंच्या पारजक्तानं पुन्याहून सुंदर बॅग आणली होती बारकू आज्जीसाठी. त्यात दोन साड्या कोंबून कपाळावरचं मेणावर लावलेलं कुंकू पदराच्या टोकांन, आरशात बघून नीट केलं. आणि त्या रिक्षात बसल्या. रिक्षासोबत मनही मागे मागे धावत होतं. खड्डे आले की ठेचकाळंत. खड्डेच लई.
 सासूच्या लाथा नि नवऱ्याचा दारू पिऊन मार. यात चार वरीस गेली. लगीन झालं नि वरिसानी न्हाणं आलं. तीन वरीस झाली तरी लेकरू होईना. त्ये काय माज्या हातात व्हतं? सासऱ्यानं माहेरात आणून घातली नि बापाला निक्सून सांगितलं. आमाला तुमची मुलगी सून म्हणून नगं. मंग धा वरीस बापाच्या दारात. माय तर लहानपणीच खर्चली होती. सावतार मायच्या हाताखाली काम तर करावं लागायचंच आनि खायची पन वानवा असायची. शिळे तुकडे पाण्यात भिजवून खायची पाळी. बापाच्या दारात येऊन बी लई वरीस झाली. शेतात खुरपाया जा. घरात काम करा. कडोसरीला दिडकी नाही. जीव चिंबून जायचा. शेजारच्या काकीची भाची हमेशा गावाकडं यायची. ती परळीच्या साळंत सात बुकं सिकलीवती. गरज लागली तर ये सांगून पत्ताबी देऊन गेली होती. तिला माजी लई

६४ /कथाली