पान:कथाली.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मी सचिन खंडागळे पाटील. इथे बारकाबाई खंडागळे पाटील राहतात का? मी त्यांच्या मालकाच्या गावाहून आलोय." चौकशी करू लागला.
 "आमच्याकडं बारकूमावशी आहेत, पण त्यांचे आडनाव जाधव आहे. नयना, मेसमधल्या बारकूमावशींना बोलाव गं. बसा तुम्ही. येतीलच." मीराताईंनी नयनाला सांगितले. बारकामावशीला मोरणीची भलतीच हौस. गेल्या महिन्यात ही सोन्याची मोरणी नयनाने त्यांना आणून दिली होती. मीराताईंनी चेष्टाही केली होती.
 "मावशी, पोरी 'बुढी घोडी लाल लगाम' असं चिडवतील हं. तुम्हाला खूप आवडते का हो मोरणी?"
 "व्हयं ताई, लगीन झालं तवा मायनं दिलीवती. लई आवडायची मला. तीस वरिसांच्यावर झाली की. आता लईच वाढवाया लागलीय. म्हटलं दुसरी करावी."
 "सारखी तुटते का? एवढीशी तर आहे." नयना म्हणाली.
 "तुटली म्हणू नका ताई. काकंणं, काळी पोत, मोरणी वाढवते. मालकाच्या मढ्यासोबत जाते तवा तुटते... कुठं का असनां बिचारा. नीट ऱ्हावा."
 "मावशी इथं येऊन अठ्ठावीस वर्ष झाली. पण, काही बदल नाही तुमच्यात. वडाची पूजा, उपास... सगळं करता, कसं हो?" मीराताई हसून म्हणाल्या होत्या.
 "ताई, जे माईनं दुदातनं पाजलं त्ये मरेस्तो कसं जानार वो? पन आपल्या पोरीचं पटतं मला: नैनाताईंच बगा की, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या हापिसर नवऱ्याला सोडून लेकीला घेऊन येकटी ऱ्हाते. त्यवढी धिटाई कुठून यावी आमच्यात. आमाले सिक्सन न्हाई. मायनं भाकऱ्या भाजाया नि नेटकं, चवदार कालवण कराया शिकविलं. त्यावर जीव जगवीत होते. पन चार बुकं शिकल्याला चुलत भैनीन हितं आनलं नि माजं सोनं झालं. माजी मातीबी तुमच्याच दारात व्हायची. तुमचा नसेल इसवास, पन ताई येक इनती हाय. माजी हाडं बरीक गंगाखेडच्या गंगेत टाका बरं का..." असं म्हणत मावशी डोळ्यात पाणी येईस्तो

हसत सुटल्या होत्या...
 "कशापाई बोलवंल नैनाताई..." बारकामावशीच्या प्रश्नानं नयना भानावर आली.
 "मावशी, तुमच्या मालकाच्या गावाहून एक मुलगा आलाय, बोला त्याला, चला ऑफिसात."

कुकवाला आधार, फक्त मेणाचा!/६३