पान:कथाली.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिला. "सुनबाई, तू बी घे कोपभर नि सासूजवळ बस." असे सांगून महादेवाला हाक मारली. च्याची क्याटली आणि दोन कप बाहेरच्यासाठी पाठवले.
 "नंदा, मी पोरांना घेऊन जाते, तिथंच जेवतील त्यांना नको घरात, माझ्या नात्रूंडांसोबत खेळतील बी." अंज्या सुन्या आणि संगीताला घेऊन घरी गेली.
 बाहेर येगळीच चर्चा रंगली होती. "इलासा, हे बघ, आंब्याला बी सांगावा धाडावा लागेल. तुझी मोठी माय कुठल्यातरी संवस्थेत सैपाक करती नि तिथंच राहती म्हणं. कालीजातल्या पोरींसाठी जेवण तयार करती. तिला बी सांगावा धाडावा लागंल जणू? व्हय संकर बाप्पा." व्यंकप्पाच्या मोठ्या चुलत्यानं संकर बामणाला विचारलं. "व्हय व्हय लवकर धाडा. दुपार पासवर इथं पोचाया हवी. नाऱ्या गायक्याला मगाच निरोप देऊन मांडवा नि धानोऱ्याला पाठवलं हाय. समिंदरा, मंगला दोन्ही जावई दुपारपासवर इथं पोचतील. धानोर लई लांब नाई पण मांडवा डोंगरात हाय. व्यंकप्पाच्या बहिणीला जनाबाईला धानोऱ्याहून केजास फोन करून कळवाया सांगितलंय. दुपारपासवर समदी जणं येतील. तंवर ती बाई बी याया हवी." संकर बाप्पांनी सल्ला दिला आणि कानावरचं बालपेन काढून कागदावर सामानाची यादी लिहाया लागले.
 एवढ्यात एकानं शंका काढली. "अरं, ती बाई ज्या संवस्थेत काम करते ती संवस्था नवऱ्यानं हाकलून दिलेल्या बायांसाठी काम करते म्हणं. लई मागं यंकप्पाकडं परळीचे पोलिस कागद घेऊन आले होते. पण यंकप्पानेच सांगितलं पोलिसांना. यंकाण्णा गाव सोडून मुमईला गेलाय कायमचा. आणि त्यांनी बी ईसवास ठेवला. तवापासून नाही आलं कुणी."
 "अरं व्यंकप्पापासी होतं काय द्यायला त्या बाईला? दोन एकराचा तुकडा. त्योबी कोरडवाहू. या भामाक्काचा इलास जमिनीत कस्ट कराया लागला तवापासून बरं चाललंया. सूनबी अंगणवाडीत काम करती." दुसऱ्यानं री ओढली. "बघा बाबा. त्या बाईला आनायचं तर परळी गाठाया होवं. दोन तास कसे बी लागणारच. न्हाईतरी त्या बाईला कंदी आनलं हितं? शानीहून चार साल झालं तरी पोटूशी ऱ्हाईली न्हाई. तवा आमच्या बाप्पानीच तिला म्हायेरी नेऊन घातलं. नि भामाक्काशी लगीन लावलं..." मोठा चुलतभाऊ सांगू लागला, "पण न आणून कसं भागेल? त्याच्या जीवाले शांती कशी व्हावी? तिचं डोरलं आन् बांगड्या

कुकवाला आधार, फक्त मेणाचा!/६१