पान:कथाली.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेऊन ठेवली. हात धुवून डेचकीतलं तांब्याभर पाणी चेहऱ्यावर मारलं. घशात गटागटा ओतलं. सुनेला आवाज दिला नि घाईने भामाक्काच्या घरात शिरली. एव्हाना अर्ध गाव बाहेर जमा झालं होतं. तिचा अंदाज खराच होता. ती परत अंगणात आली आणि गोंधळकरी तात्याबाला हाक मारली. तो जवळ येताच तिने बारक्या आवाजात हुकूम सोडला. "तात्याबा, अजून दोघी पोरी, केजाची भैण, भामाक्काचे भाऊ आल्याबिगर काईच होनार नाय. इलासबी रानातून यायचाय. तुम्ही लोकानले दुपारून यायला सांगा. हितं नगा जमू म्हनावं. मी च्या करून आणते. तेवढं तरी पिऊ द्या भामाक्काला आणि घरच्यांना. भुकेनं जीव तडपेल म्हातारीचा. सांगा समद्यांना.” असे सांगून ती तिच्या घराकडे वळली. तिला आठवला तिच्यावर गुंदरलेला परसंग.
 ...तिच्याहून वीस-बावीस वर्षांनी थोरला असलेला नवरा खोकून खोकून पहाटेच केव्हा तरी खर्चला होता. घरात पहिलीचे दोन मुलगे आणि त्यांची पिलावळ, चार लेकी चार दिशांना चार चार कोसांवर परणून दिलेल्या. लगीलगी त्यांना सांगावा धाडला. रातच्याला म्हाताऱ्याची माती झाली. पण आंजीला चूळ भरायलासुद्धा कोणी पाणी दिलं नव्हतं. माती करून माणसं परत आल्यावर शेजारच्या भामाबाईनं भाकऱ्या नि कालवण धाडलं होतं. रातच्याला मढं शेतात नेल्यावर आंज्याला पाणी बी पाजलं होतं. ते अन्न पाहिलं नि वाटलं, बकाबका खाऊन भुकेचा डोंब शांत करावा पण जनाची लाज? जेमतेम चोतकर भाकर घशाखाली घातली होती हे समदं होऊन लई काळ गेलाया. आज भामाबाईवर बारी आलीया...
 अंज्यानं गवरीवर रॉकेल ओतून चुलवण पेटवलं. एक मोठं लाकूड आत सरकवून वर च्या चं भगोणं चढवलं. चहाची भरलेली क्याटली घेऊन डोकीवरचा पदर पुढे ओढून आंज्या भामक्काच्या घरात शिरली; ढाळजात विलास गुडघ्यात मान खुपसून बसलावता पुरुष माणसं जमा झाली होती. ढाळज गच्च भरून गेलं होतं. आंज्याने आत जाऊन स्टीलचा मोठा पेला घेतला. त्यात चहा ओतला आणि पदराने तो गरम पेला भामाक्काच्या पुढे ठेवला. "पिऊन घ्या आक्का, जे व्हायचं ते होतंच असतं. समद्या किल्ल्या त्याच्या हातात. त्यानंच कुलूप घातलं, आता उघडणार कोन? अजून पोरी यायच्या आहेत. तुझ्या भावाला बी सांगावा धाडला आहे. उलीसाचा चा पिऊन घे. पी माय. समदं होईस्तो जीव तं रहाया होवा.” असं म्हणत अंज्यानं भामाक्काच्या पदरात पेला पकडून तिच्या हातात

६० /कथाली