पान:कथाली.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुकवाला आधार, फक्त मेणाचा!

 पाहता पाहता या शिवेपासून त्या शिवेपर्यंत बातमी पोचली. घरातला थोरला ल्योक, विलासदादा रातच्याला रानातच मुक्कामाला होता. तो अजून घरी यायचा होता. घरात त्याची माय भामाक्का, बायको नंदा अन् दोन लेकरंच होती. नंदाला उमजेना, आता कुणाला पाठवावं रानात हा सांगावा घेऊन? तिने तिच्या थोरल्याला, सुन्याला बोलावलं. त्याच्या कानाशी लागून, पलीकडच्या कडेला राहणाऱ्या भावकीतल्या चुलत दिराला निरोप दिला. सहदेवनाना धावत्या चालीनं दाराकडं आला. भामाक्काच्या समोर खाली मान घालून खिनभर बसला. काकीनं जडभरल्या आवाजात विनवलं.
 "सहदेवा, सुन्याची दुचाकी घिऊन धानूरकडच्या रानात जा. इलास तितेच मुकामाले गेलाय... मालकाचं, तुज्या काकाचं दानापानी संपलं बाबा.", आन् ती जमिनीवर डोकं हापटू लागली. सहदेव घाईनं उठला आणि साईकलवर टांग मारून रानाकडं निघाला.
 सुन्या इलासदादांचा थोरला नि एकुलता एक ल्योक. यंदा आठवीला गेलाय. त्याला साळंत जान्यासाठी दादांनी भारीची सायकल आणलीय. एरवी कुण्णाला हात लावू देत नाही सुन्या. आता आज काय म्हननार? सहदेव हातातली सायकल वेगात पळवत होता.
 पाहता पाहता दारासमोर माणसं जमा व्हायला लागली. शेजारची अंजाभाभी रानातल्या गायवाड्यातनं दुधाची चरवी आन् एका हातात शेणाचं टोपलं घेऊन येत होती. तिनं शेणाचं टोपलं अंगणात पालथं टाकलं नि दुधाची चरवी चुलीजवळ

कुकवाला आधार, फक्त मेणाचा!/ ५९