पान:कथाली.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अहो पण सावितराताईसाहेबांना लागायचं न्हाईये. त्यांना कसं नेता येईल. समद्यांनी येकाच जीपमंदी बसायचं म्हंजी इटाळ न्हाईका व्हायचा. शिवाय पुढच्या पंधरवड्यात पोळा हाई तवा जायचंच...
 तुमाला सांगितलं तेवढे करा. जीभ लांबवाईची न्हाई लई. झाडा म्हनलं की झाडायचं. का नि कोन येनार हाय? असले सवाल न्हाई पुसायचे. आम्हाला फुजूल बोलणं आवडत न्हाई. लगीलगी तयारी करा. माधवराव वाकड्या शब्दांत गरजले.
 सावित्रा माधवरावांची धाकटी बहीण. धाकटी म्हणून जरा लाडाकोडात वाढलेली. गावात सातवीपतर शाळा होती. सावित्रा सातवी पास होऊन घरीच बसली होती. म्हणजे घरी बसवली होती. द्वारकाबाईसुद्धा सातवी पास होत्या. बाईला लिहिण्यावाचण्यापुरतं शिक्षण मिळालं की पुरे होतं. असं सर्वांना वाटे. तिची अक्क्ल चालून चालून कुठवर चालणार? फार तर चुलीपुढे.
 कारखाना झाला. माधवराव चेअरमन झाले. गावाकडून कारखान्याच्या बंगल्यात राहायला आले. द्वारकाबाईसुद्धा सोबत म्हणून सावित्राही त्यांच्याबरोबर इथे राहायला आली. सावित्राची आई... द्वारकाबाईंची सासू-सावित्रा पाचवीत असतानाच खर्चली होती. माधवरावांच्या वडिलांनी, आपला ल्योक, साखर कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर थोड्याच दिवसात समाधानानं डोळे मिटले होते. माधवरावांचा धाकटा भाऊ दिगंबर साताऱ्याला त्याच्या सासुरवाडीच्या गावाकडं डॉक्टरकी करत होता. त्याची बायको बिन भावाबहिणीची एकुलती एक होती.
 सावित्रा मुळातून हुशार. भरतकाम, विणकामाचा तिला भलता नाद होता. स्वेटर तर छान विणायची! माधवरावांचा स्वेटर तिने चार दिवसांत हातावेगळा केला. बैठकीच्या खोलीत बटणांची बदकजोडी, टिकल्यांचा बाळकृष्ण, काचकमलाचं तोरण अशा कितीतरी वस्तू मांडलेल्या होत्या. जे जे पाहिलं ते ते करण्याचा तिला नाद होता. या नादापायी तिचं बाहेर... शेजारीपाजारी जाणयेणंही बरंच होतं. द्वारकाबाईंनी कधी तशी हौस दाखवली नाही.
 बँकेतल्या शिरसाठसाहेबांची बायको सोलापूरची होती. म्पॅट्रिकपास तर शिकलेली होती. ती या असल्या गोष्टीत भलती तरबेज होती. ती दरवेळी विणकामाचे नवेनवे नमुने माहेराहून शिकून येई. तिचं घर सिंधी टाक्याच्या चादरी नि उशीच्या खोळा, पडदे, भिंतीवर टांगायची तऱ्हेतऱ्हेची चित्रे यांनी भरलेलं होतं.

५४ /कथाली