पान:कथाली.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बायकोत कधी रमलं नाही. गुंतलं नाही की खोल मुरलं नाही. रीत म्हणून नवराबायकोचं नातं. पण कधी ऐशीनं गप्पा केल्या नाहीत की बाहेरगावाहून येताना नवीजुनी चीज बायकोसाठी म्हणून आणावीशी वाटली नाही. दरवर्षी दिवाळीतल्या पाडव्याला मात्र न चुकता सोन्याचा पिवळा डाग घरात येई. पण तिथेही माधवरावांची हौस नाही तर पसंती नसायची. रिवाज म्हणून पाडव्याला ओवाळणीत ताम्हनात दागिना पडे.
 लग्नानंतर पाच वर्षांनी बेबीचा जन्म झाला. आधीच नाजूक बांध्याच्या द्वारकीला हे बाळंतपण फार जड़ गेलं. नऊ महिने सासरच्या घरात, कामाधामात जीव जुंपलेला होता. मूल आडवं आलं म्हणून वरून काढलं. त्यात, ऑपरेशननंतर टाक्यात पाणी शिरलं. या बाळंतपणानं द्वारकाबाईचा जीव हल्लक बनून गेला. याच काळात माधवराव वरचेवर राजकारणात गुंतू लागले. त्यांचं लक्ष घरातून पार उडून गेलं.
 द्वारकाबाई आपल्या मनातली सारी ममता, जिव्हाळा बेबीवर ओतीत. बेबी, जणू त्यांच्या काळजाचा कोमल तुकडा. बेबीनंतर घरात पाळणा हाललाच नाही. माधवरावांच्या मुंबईच्या फेऱ्या साखर कारखान्यामुळे तर वाढल्याच. पण त्याहीपूर्वी ते राजकारणात पडल्यापासून मुंबईला वरचेवर जात. तिथेच ते कुणांत तरी गुंतत आहेत, असा बोलवा सगळीकडे होता. एक बारीक खरं की सगळे सगेसोयरे वंशाच्या दिव्यासाठी दुसरं लगीन करा असं सांगत असतानाही माधवरावांनी दुसरा विवाह केला नव्हता. बेबीत त्यांचं मन सगळ्या बाजूंनी गुंतलं होतं. तिने खूप शिकावं असे त्यांना वाटे. एखाद्या गरीब घरचा हुशार मुलगा घरजावई करावा आणि त्याच्या आधाराने म्हातारपण घालवावं असा त्यांचा साधा हिशेब असे. पण साखरकारखाना झाला आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. पाहता पाहता माधवराव लांब लांब ढांग टाकीत पुढे गेले. दूर दूर गेले. द्वारकाबाई मात्र होत्या तिथेच होत्या. आल्या गेल्याची उस्तवार, चहापाणी, जेवणीखाणी, देणीघेणी निस्तरण्यात दिवस जात होते. बेबीला लहानपणापासूनच पुण्याच्या हुजूरपागेत शिकायला ठेवले होते. वाचनाची आवड, बोलण्यातली धिटाई, डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारेसारखा स्वच्छ, स्पष्ट आवाज आणि चेहऱ्यावर वयाचा गोडवा. बेबी लहानपणापासून घरापासून दूर राहिल्यामुळे काहीशा स्वतंत्र वृत्तीची बनली होती. एकुलती एक म्हणून थोडी हट्टीही होती.

५२ /कथाली