पान:कथाली.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या अशक्त गार कापऱ्या बोटांचा. ओलसर अनपेक्षित स्पर्श....बेबी विस्फारलेल्या नजरेनं आईकडे पाहू लागली. त्या लंगड्या पत्रकारालाही ते दृश्य अनपेक्षीत होतं आणि त्याचक्षणी माधवरावांनी खोलीत प्रवेश केला. द्वारकाबाई जागच्या हलल्या नाहीत. धनंजयच्या जवळच्या खुर्चीवर त्या बसून राहिल्या. माथ्यावरचा पदर सवयीनं पुढे ओढून नेटका करीत त्यांनी स्थिर नजरेनं नवऱ्याकडे पाहिलं.
 गेल्या कित्येक दिवसांत द्वारकाबाईंनी आपल्या नवऱ्याला असं अंगभरून पाहिलंच नव्हतं. माधवरावांचा जाडजूड उंचापुरा देह, पाहणाऱ्याच्या मनात धाक निर्माण करी. अस्सल खानदानी रग दाखविणाऱ्या हात हात मिश्या, भेदक लालसर डोळे, कपाळाच्या डाव्या अंगाची उभी हिरवी शीर, ते रागावले की शीर फुगून यायची. साखर कारखान्याचा व्याप वाढत गेला तसे त्याचे केस पातळ होत गेले. टक्कलही पडू लागलं. ती हिरवीशीर थेट डोक्यापर्यंत टचटचून जायची. द्वारकाबाईंना भय वाटत असे की ही फुटून तर जाणार नाही ना!
 माधवरावांकडे पाहता पाहता गेल्या सत्तावीस वर्षांच्या संसारातील चित्रं, पत्त्याच्या डावाचा पंखा हाती धरावा तशी द्वारकाबाईच्या डोक्यासमोर आली. द्वारका वांझरखेड्याच्यां कदमांच्या घरची थोरली लेक. तात्याराव कदमाची बायको लवकर वारली. द्वारका घरात आईविना वाढली. जावाभावांच्या संसारात तिची भाजणूक व्हायला नको, म्हणून तात्यारावांनी द्वारकीचं लगीन मोहनराव साबळ्यांच्या थोरल्या लेकाबरोबर, माधवरावाबरोबर ती लहान असतानाच लावून दिलं. लगीन झालं तेव्हा द्वारकी जेमतेम दोनदाच बाजूची झाली होती. लेकीचं झाल्यावर तात्यारावांनी स्वतःचं लगीनही उरकून घेतलं होतं. माहेरच्या घरात वावरणारी, बरोबरीच्या वयाची सावत्र आई. तिच्यासंग बापाचं लागट वागणं, द्वारकाला माहेरची ओढ कधी वाटलीच नाही.
 साबळ्यांच्या घरात द्वारका मुक्यानं वावरली. माधवराव पहिल्यापासूनच आडदांड स्वभावाचे. बोलणंही ठोकरं. तिला नेहमीच माधवरावांची भीती वाटे. ते खोलीत आले की तिचा जीव, आतल्या आत चिंब होऊन जाई. ते गोडीत आले तरी, ती खारीसारखं अंग चोरून, खालच्या मानेनं हो ला हो देई. आपलं माहेर भक्कम नाही, आपला बाप असूनही आपण एकाकी, अनाथ आहोत असं तिला नेहमीच वाटे. तिच्या या भित्र्या चाचरत्या स्वभावामुळे माधवरावांचे मन आपल्या

स्फोट / ५१