पान:कथाली.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तिच्या माध्यमातून गालवाकडे षड्शत उमदे असे अश्व जमा झाले. तेही डावा कर्ण श्यामवर्णी असलेले. त्रिभुवनातील सर्वच त्या प्रकारचे अश्व संपुष्टात आले होते. गालव माधवीला घेऊन विश्वामित्रांकडे गेले व हात जोडून विनंती केली. अश्वांऐवजी तुम्ही हिला ठेवा. त्रिभुवनातले अशा प्रकारचे सर्व अश्व संपुष्टात आले आहेत. मुनी गालव तात्काळ निघून गेले. विश्वामित्र तिचे अलौकिक मुग्ध सौंदर्य पाहून विचलित झाले. दहा मेनका या त्रिभुवनसुंदरीपुढे मान खाली घालतील...! तात्काळ त्यांनी माधवीला जवळ ओढले. तिचा पूर्णत्वाने उपभोग घेऊन कौमार्यभंगाच्या पापाचे क्षालन करण्यासाठी हिमालयात तपश्चर्येला निघून गेले. जाण्यापूर्वी माधवीला मुनी गालवाकडे आश्रमात सोडले. त्या क्षणापर्यंत मुनी गालवांनी तिच्याकडे विशिष्ट अश्व मिळविण्याचे साधन म्हणून पाहिले होते. पण हा क्षण त्या पलिकडचा होता. तिच्या देहाचा मोह आपणच का टाळावा असा पोक्त विचार करून गालवानेही तिचा उपभोग घेतला व नंतर त्यांनी माधवीला राजा ययातीकडे आणून स्वाधीन केले.
 ययाती महाराजांना आपल्या कन्येची करुणा आली, दया आली. पण तिला राज़गृहांत ठेवण्याचे भय वाटले. तात्काळ राज्यमंत्र्यांना बोलावून तिचे स्वयंवर मांडण्याची तयारी करण्याचा आदेश दिला आणि त्याच रात्री माधवीने तिची ज्येष्ठ सेविका अंबारिकेस बोलावून घेतले. एक श्यामल उमदा अश्व तयार ठेवण्याची हृदयस्थ विनंती केली. मध्यरात्री अंबारिकेसह तिने उत्तरेकडे अरण्यात प्रयाण केले. निबिड अरण्यात आल्यावर अंबारिके सोबत अश्व परत पाठवून लाकडी खडाव घालून काटेकुटे तुडविती माधवी चालू लागली.
 त्या तीनही बालकांचे स्पर्श, चेहरे मागे पडले होते. विश्वमित्राच्या स्पर्शाचा विष्ठेसारखा घृणास्पद् अनुभव मात्र मनातून धुतला जात नव्हता. विश्वामित्रापासून झालेल्या अश्वकाला तिने क्षणभरही छातीला लावले नव्हते. ती चालतच होती...माधवीला शुभ्रांकित हिमप्रकाश दिसू लागला. वखवखले सर्व स्पर्श गळून पडले होते. बाळमुखाचे स्पर्श दूर गेले होते. त्या सर्वांपासून ती मुक्त होती. पण स्वतःच्या अस्तित्वाचा शोध मात्र घेण्याची नवी दिशा समोर आव्हान देत होती...
 माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय? फलित काय? जगण्याचा अन्वय कोणता? माझे स्त्रीत्व? त्याचे मर्म देहात? माझा आत्मा पुरुष देहातील आत्म्यापेक्षा वेगळा? हीन? मी केवळ 'पुत्र' देण्यासाठी वापरली जाणारी वस्तू? वस्तू? दासीपुत्र विदूर

४८ /कथाली