पान:कथाली.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांनी माझ्याकडे अष्टशत उमदे अश्व, ज्यांचा डावा कर्ण श्यामल वर्णाचा असेल, गुरुदक्षिणा म्हणून मागितले आहेत.' ती मागणी ऐकून राजा ययाती महाराज विचारात पडले, असे अश्व त्यांच्याकडे नव्हते. शतअश्व घ्यायचे तर एक अब्ज गोधन शुल्क म्हणून लागते तेही नव्हते. तो दिग्मूढ झाला. त्याला ब्रह्मर्षीनी माधवीला दिलेल्या वराची आठवण आली. समोर नतमस्तक होऊन उभ्या असलेल्या माधवीच्या वराची कहाणी सांगत त्यांनी माधवीचा हात मुनी गालवाच्या हाती दिला. या कन्येच्या माध्यमातून अश्व मिळावा अशी विनंती केली.
 ... त्यानंतरचा प्रवास माधवीला समोर दिसत होता... ईक्ष्वाकु वंशाचा राजा हर्षस्व यांच्याकडे गालव मुनींनी वंशदीप देण्यासाठी माधवीला पाठवले. तिला पुत्र होताच प्रसूतिकेने तो बाळजीव राणी मेघावतीकडे पाठवला. त्याचे मुखदर्शनही तिला झाले नाही आणि चार दिवसांनी डावा कर्ण श्यामरंगी असलेले द्विशत अश्व देऊन तिची पाठवणी गालवाच्या आश्रमात केली. मेघावती राणीने त्याचे वसुमनस ठेवल्याचे तिला दासीकडून कळले.
 माधवीला दिवोदास राजाला दिलेल्या प्रतर्दनाचे गौरकांतीमुख आठवले. विलक्षण गोंडस स्पर्श. विभूतिका दाईने तो बाळजीव तिच्या कुशीत दिला तेव्हा तो भुकेला जीव बाळमुठी तोंडात घालून चूक... चुक् असा चोखीत होता. विभूतिका दासीने तिची कंचुकी सैल करून बाळाच्या मुखात तिच्या स्तनाचे लालचुटूक अग्र बळेच दिले. आणि ते चुरूचुरू दूध पिऊ लागले. कधीही न घेतलेला तो अनुभव अंगावर मधुर शहारा उमटवून गेला. तृप्तीची लाट मन भरवून गेली. चार मास होताच एक दिवस ज्येष्ठ राणी वेदिका तिच्या पर्णकुटीत आली. हातपाय उडवून नाचणाऱ्या... खुदूखुदू हसणाऱ्या प्रतर्दनाला बाळलेणी चढवून घेऊन गेली. येताना माधवीसाठी नूतन वस्त्रे अलंकार आणले.
 'हे ययाती कन्ये, तू आमच्या राज्याला वारस दिलास. स्वामी दिवोदास, मी महाराणी वेदिका आणि समस्त प्रजा तुझे ऋणी आहोत. तू वस्त्राभूषणांचा स्वीकार कर. महामंत्री तुला मुनी गालवांच्या आश्रमात उमद्या अश्वांसह पोचवतील...
 या साऱ्या प्रहारांचे घाव सोसून माधवीचे मन बधिरले होते. भोजनगरीच्या राजा कुशीनराला दिलेल्या पुत्राकडे... शिचीकडे पाहण्याचे धाडस ती करू शकली नव्हती.

त्या तिघी/ ४७