पान:कथाली.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शुक असा ध्वनी कानावर आला तिने चमकून भोवताली नजर फिरवली. एक अगदी इवलेसे पिल्लू पानांच्या दाट शय्येवर वरून पडले होते. तिथल्या तिथे ते थरथरत होते. ते तिने अलगद उचलले आणि सभोवार निरखू लागली. ज्या वृक्षाखाली ते पडले तो शालवृक्ष थेट आभाळाला भिडला होता. बहुधा शिशिर ऋतूच्या अखेरचे सुगंधी वारे वाहू लागले होते. आकाशमोगरीच्या अखेरच्या फुलोऱ्याच्या मोहक सुगंध लहरी वाऱ्याचा हात धरून नर्तन करीत होत्या. तिला प्रश्न पडला कुठे ठेवावा हा चिमुकला जीव?...कुठेच सुरक्षित जागा दिसेना. तिने तिच्या उत्तरियाचे डावे टोक हळुवारपणे कटीच्या मखलेत खोवले. आणि त्या रेशमी झुल्यात तो बालजीव हळुवारपणे ठेवला आणि ती पुढे चालू लागली. थोडी पुढे गेली तोच तिला पंखांच्या उडण्याचा ध्वनी पाठलाग करीत असल्याचे जाणवले. वर्षाऋतूच्या आगमनाची वार्ता देणाऱ्या नीलपक्ष्याची ती मादी होती. ती माधवीच्या उजव्या स्कंधावर बसली आणि निळ्या डोळ्यांनी तिच्या उत्तरियात ठेवलेल्या चिमण्या जिवाकडे निरखून पाहू लागली. माधवी वटवृक्षाच्या धरणीला टेकलेल्या शाखेवर विसावली आणि तिने नीलमादीला जवळ घेतले.
 ...तुझ्या पिल्लाला मी पर्णशय्येवर ठेवते. तू ते अलगद घेऊन जा घरट्यात. त्याला उडायला शिकव. दाणापाणी दे. मग ते उडू लागेल. आणि भुर्र भरारून अवकाशात दिसेनासे होईल. मग तू पुन्हा एकटीच.
 तिने दीर्घ निःश्वास सोडून तो बाळजीव पानावर हळुवार हातांनी ठेवला. क्षणार्धात ती पक्षिणी चोचीत तो रेशमी गोळा घेऊन उंच उडाली. जणू आकाशाला टेकलेली पक्षिणी. थोड्याच काळात ती पक्षिणी परत येऊन माधवीच्या स्कंधावर थांबली. आनंदाचे सीत्कार काढले. कृतज्ञता व्यक्त करून परत अवकाशात भरारली.
 त्या रेशमी झुल्यावरचा पिल्लाचा होणारा हुळहुळता स्पर्श. माधवीच्या मनात घट्ट कोंडलेल्या स्मृतींचे गाठोडे उकलून गेला. ब्रह्मषींनी दिलेल्या वरानुसार तीन राज्यांच्या राजेंद्रांना, त्यांच्या वंशाला दिलेला तीन औरस पुत्रांची आठवण झाली...
 पिताश्री ययाती महाराज आणि भार्या देवयानी यांची ती स्वरूपसुंदर कन्या. अवघ्या चौदा वर्षांची असेल, तरुणाईच्या ऐलतीरावरती. देहावरची कमळं

त्या तिघी / ४५