पान:कथाली.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राही. पण एक दिवस तिने शांतपणे उत्तर दिले होते, 'शेषाची नाही'. त्यावेळी द्रौपदीच्या उद्धटपणा ऐकून ती संतापली होती. संताप कोणाजवळ व्यक्त करणार या विचाराने आतल्या आत खदखदली होती. पण या क्षणी शेषाने उद्ध्वस्त केलेल्या तनामनाला द्रौपदीचा हात घट्ट धरून ठेवावासा वाटतो आणि म्हणावेसे वाटते, तुझे पाच माझे दोन पण तुझ्यामाझ्या तिच्या माझ्यात 'देहा'ची भूमिका एकच?

* * *


 पांचालदेश नरेश द्रुपदाची अग्नीतून निर्माण झालेली कन्या द्रौपदी, हिच्या स्वयंवराची वार्ता देशोदेशीच्या नरेशांना, राजपुत्रांना कळविण्यात आली होती. चंद्रचांदण्याच्या आकृती रेखलेल्या मखमली कापडांनी सजवलेला विशाल मंडप देशोदेशीच्या नृपतींचे, राजपुत्रांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होता. झुळझुळीत रेशमी वस्त्र परिधान केलेल्या सेविका, सेवक यांची धावपळ सुरू होती. मंत्रीगण, महामंत्री आदी मान्यवर, प्रमुख प्रवेशद्वाराजवळ सुगंधी फुलांचे हार, सुगंधी तेल, चंदनगंध, अक्षता घेऊन उभे होते. तिन्ही लोकीचे नरेश, राजपुत्र, धनिक आपल्या अनुभाविक... सेवकांसह मंडपात विराजमान होत होते. व्यासपीठासमोरच्या गर्द काळ्यानिळ्या संगमरवरी पाषाणाच्या वर्तुळाकृती सौधावर एक भलीमोठी कढई तेलाने भरून ठेवली होती. त्यात एक स्तंभ रोवून त्याच्या शेवटच्या टोकाला एक गतिमान चक्र बांधले होते. त्या चक्राच्या एका आरीला सोनसळी मासा बांधलेला होता. ते चक्र वेगाने फिरत होते. स्थिर तैलात मत्स्याचे प्रतिबिंब निरखून जो कोणी पुरुष बाणाने त्याचा वेध घेईल त्याला पांचाली वरमाला अर्पण करील, अशी घोषणा साक्षात द्रुपदाने केली. स्वयंवराची ती अभेद्य, अत्यंत अवघड अट ज्ञात होताच अनेकांचे प्राण आतल्याआत लुप्त झाले. अनेकांनी खांद्यावरचे धनुष्य काढलेच नाही. इतक्यात...
 उगवत्या सूर्याच्या सळसळीत सोनेरी उन्हासारखी तेजस्वी कांती असलेला अंगराज कर्ण धनुष्य सावरीत व्यासपीठाकडे जाऊ लागला. क्षणभर का होईना त्याच्या आरपार छेदून जाणाऱ्या दृष्टीचा, तेजःपुंज देहाचा तिला मोह पडला होता. तो धनुष्याची प्रत्यंचा ओढणार इतक्यात पांचाली भानावर आली आणि काहीशा कर्कश स्वरात बोलली.

४२ /कथाली