पान:कथाली.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
त्या तिघी

 उपवनात विश्वकर्म्याने रचलेल्या, राजगृहापासून षड्श पावले दूर असलेल्या वनगृहातील उपरिनिविष्ट सौधावर बसून भानुमती क्षितिजापर्यंत पसरलेल्या घनदाट वृक्षांनी वेढलेल्या वनाकडे एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यांत वेदनांचे अस्वस्थ काहूर घोंगावत होते. हस्तिनापुराच्या बलदंड, धनुर्विद्येत आणि गदायुद्धात निपुण नरेशाची लाडकी भार्या, धृतराष्ट्राची स्नुषा,... आणि तिच्या भरजरी वस्त्रात हे दारूण, लाजीरवाणे सत्य बांधलेले? तिच्या कंठाला कोरड पडली. वाळामिश्रित सुगंधी जलाचा मधुकुंभ समोर होता. ती दासीला कर संकेत करणार इतक्यात तिच्या लक्षात आले की, आज ती अगदी एकटी आहे. एकाकी आहे. शैय्यागृहात महाराज विमनस्कपणे येरझारा घालीत आहेत. इतक्यात तिला वनातून सळ् सळ् असा नाद ऐकू आला. धरतीला कळतनकळत स्पर्श करीत शेष वेगाने वनसंकुलाकडे झेपावत आहे. नक्कीच...! तिच्या शरीरातून घृणेचे शहारे उमटू लागले. शय्यागृहात येरझाऱ्या घालणाऱ्या महाप्रतापी दुर्योधनाचे सर्वांग शिथिल होऊन लुळे पडले.
 ...भानुमतीला आश्रमातले वादविवाद आठवत होते. कणाद आणि ईशान वाद घालण्यात निपुण. अर्थात दोघेही आपापल्या ज्ञानभूमिकेवर ठाम. ईशानला 'सो ऽ हम्' ची भूमिका आत्मा परमात्म्याचे सायुष्यत्व... एकरूपत्व, ईश्वराचे अनाकलनीय अदृष्यमान अस्तित्व सत्य वाटत असे. वेदांची भूमिका हीच अंतिम सत्याची दिशा या मतावर तो ठोस होता. तर कणाद मात्र चार्वाकमताचा स्थिर अनुयायी.

४० /कथाली