पान:कथाली.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दाखवून आणले होतंस. पण कालपासून ते वर्तमानकाळात यायलाच तयार नाहीत. नशीब अजय इथे आहे. तो पुण्याला येईल. ईशाजवळ चार दिवस राहील. पण येण्यापूर्वी तू ईशाला १ जानेवारीपासून तिथल्या शाळेत घालण्याच्या दृष्टीने सरस्वती भुवनच्या मुख्याध्यापकांना फोन करून सांग. नीता फोनवरून सांगत होती. ऐकतानाही रजनीने मन मोठ्या मिनतवारीने स्थिर ठेवले.
 "डॉक्टर म्हणताहेत आठ दिवस वाट पाहू. ट्रीटमेंट सुरू आहे. बाकी सर्व नॉर्मल. जेवण व्यवस्थित. तुझी वाट पाहते. ईशाला काहीच सांगितलेले नाही." नीताने फोन ठेवला.
 रजनी नूतन मराठी महाविद्यालयाच्या ईशाच्या मुख्याध्यापकांना भेटून आली. तिच्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधले सहकारी मदतीला आले. अजयजवळ ईशाला ठेवून ती औरंगाबादला आली. नंतर ईशा नीताबरोबर आली...
 ...एका वेगळ्या वळणावरून जाणारा हा एकाकी रस्ता. फक्त रजनीसाठीचा.
 "बरं झालं रजनी आलीस. नीताचं अजय पुराण अजून संपलेलं नाही." मंगेशने रजनी आल्यावर सुस्कारा सोडला. वर्तमानाचं भान गेल्यापासून मंगेश बाहेरच्या व्हरांड्यातल्या झोक्यावर नुसता बसून राहतो. झुलत राहतो. जेव म्हटलं की जेवणार. समोर चहा-खाणे ठेवले तर खाणार. अमुक खायला कर अशी मागणी नाही. अजय येताना मंगेशची पुस्तकं घेऊन आला. पुस्तकं चाळण्याचा नवा चाळा सुरू झाला. इतकंच.
 "...नीता मॅडम, हा अल्झायमर डिमोन्शिया आहे. हा एक प्रकारे मानसिक तणाव आहे. त्यातून ती व्यक्ती बाहेर येण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. नसतेच म्हणा ना. एका विशिष्ट काळात मन अडकून बसते. वर्तमानाची दखल त्या व्यक्तीच्या मनाला नसते. मंगेश यातून बाहेर येतील ही शक्यता...आशा फेकून देऊन निरामय होऊन ममतेने त्यांची काळजी घ्या. ते संतापणार नाहीत, अस्वस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्या आणि हे तुमच्या आई,... रजनीताईच करू शकतील. कधीही मदत लागली तर निःसंकोचपणे मला फोन करा." डॉ. दिनेश देशमुखांनी नीता अजयना नीट समजावून सांगितले होते. ईशाला मात्र तिचा लाडका बाबाजोब्बा तिला ओळखत नाहीत हे जाणवून खूप वाईट वाटले होते.

स्कूटरचोर मुलगी / ३७