पान:कथाली.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मंगेशचा हट्ट ऐकून रजनी क्षणभर हळवी झाली. कित्येक दिवसांनी आज मंगेशनी रजन अशी पूर्वीसारखी साद घातलीय. तिचे डोळे भरून आले. दाटल्या आवाजात तिने समजावले, "अरे, तुझी नात ईशुली आहे ती!"
 रजनी-मंगेश विवाहबद्ध झाले तेव्हा दोघेही पंचविशीच्या आतले होते. जावई अजय १०वी ते पदवी परीक्षेत सतत प्रथम येणारा हुशार विद्यार्थी. उंची भरपूर. कराटे चैंपियन, अर्थशास्त्राचा पदवीधर, एमबीएत प्रथम येताच कंपनीत चांगली नोकरी लागली. नीता महाविद्यालयात असल्यापासूनच त्याच्यात अडकली होती. त्याचा सावळा रंग मात्र मंगेशला बोचत होता. खरेतर सुधांशूचा अनुपम त्याला आवडला होता. अजयला दोन वर्षांसाठी प्रागला जाण्याची संधी मिळताच लग्न करूनच जा असा आग्रह रजनीने केला. दोन वर्षांनी रशियाहून परत येताना नीताच्या कडेवर ईशा होती. रजनीला पन्नाशी ओलांडायला अजून चार वर्षे अवकाश होता. मंगेशही पन्नाशीच्या अल्ल्याड एक वर्ष होता. नातीचं कौतुक करायला आजोबा आजीही तसे तरुणच होते. अजयच्या सततच्या बदलणाऱ्या अधिक पगाराच्या नोकऱ्या आणि परदेशवाऱ्यांमुळे रजनी मंगेशने त्यांना वेगळे घर करू दिले नाही. नीताने पुण्यात स्थिर झाल्यावर विद्यापीठातून इंग्रजी विषयाची एम.ए. पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन संपादन केली. त्याच वर्षी औरंगाबादच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात नोकरी मिळाली. अजयचा सततचा प्रवास सुरूच होता. औरंगाबादचे शैक्षणिक वातावरण चांगले होते. ईशा आठवीत गेल्यावर दोन वर्षेआधीच रजनीने स्वेच्छेने निवृत्ती घेतली. औरंगाबादमध्ये जालना रोडला विशाल कॉम्प्लेक्समध्ये बंगलाही घेतला होता. भोवताली बदाम, चिक्कू, पपई, डाळिंबाची दोन-दोन झाडे लावली होती. जमीन चांगली. मंगेश पुण्याला नीताजवळ राही. ईशाची १०वी होईपर्यंत मंगेशने पुण्यात राहायचे ठरवले होते. पण ईशा ९वीत असतानाच डिसेंबरच्या एका गारठलेल्या रात्री फोन खणाणला.
 "आई, काल बाबा झोपेतून उठले. अजूला पाहताच कडाडले, "नीतू, तुला कितीदा सांगितलंय की हा मुलगा मला पसंत नाही. काय करतोय हा इथं. हा सारखा तुला भेटतो म्हणून सुधाचा अनुपम नाराज होऊन लंडनला निघून गेला. पण तो येईलच. रजनीला तरी कळायला हवं होतं. बोलाव तिला... आई इथल्या मेडिकल कॉलेजमध्यल्या सायकिॲट्रिस्टना दाखवलं. त्यांचा डावा हात गेल्या वर्षापासून थरथरायचा. त्यातला जोर कमी झाला होता. तेव्हा तू त्यांना डॉक्टरना

३६ /कथाली