पान:कथाली.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्त्यांशी त्यांचा विशेष स्नेह होता. घरातील सणवार दाते पंचांगानुसार होत. मंगेशची आई वऱ्हाडातील अकोल्याची. ती आल्यापासून मात्र सर्वांच्या पंचांगासोबत तिने घर जोडून घेतले. सणवार, सुट्या सर्वसामान्य कॅलेंडरप्रमाणे साजरे करण्याचा प्रघात पडला...
 "रज्जू, तू. पोलिसात केला का फोन?" मंगेश बोलत असतानाच ईशा स्कूटरवरून फाटकातून आत आली. तिने स्कूटर बदाम वृक्षाच्या सावलीत लावली नि 'आज्जू अशी हाक देत आजोबांच्या खोलीत गेली.
 "ममाला दडपे पोहे करून ठेव म्हटलं होतं. केलेत तिनं?" ईशाने विचारले.
 "डोंबलं तुझी ममा करतेय. १६ जूनला कॉलेज सुरू होणार आहे. पुस्तकात डोकं घालून बसलीय. पण आज्जू आहे ना तुझी करून ठेवलेत फोडणी घालते. फक्त, दडपून ठेवलेत मघाच..."
 "आज्जू उठू नकोस. मी जरा ढळत्या हाताने तेल घालून फोडणी करते. तुझी थेंबभर तेलाची फोडणी, फोडणी कशी पोहे... कांदा... नारळाचा चव सर्वांना कवेत घेणारी हवी. चमचमीत !" आज्जूला खुर्चीत बसवत ईशा स्वयंपाकघरात गेली.
 मंगेश प्रत्येक झाडाला पाणी घालत होता. झाडाभोवतीचे आळे नीटनेटके करीत होता... ईशाने दोन खुर्ध्या बागेतल्या हिरव्यागार लॉनमध्ये मांडल्या.
 "ममा, दडपे पोहे खायला चल. पुस्तकातलं दडपलेलं डोकं नि मन जरा बाहेर काढ. गुलमोहोर बघ कसा इथूनतिथून रुमझुमलाय आणि फोडणी मी दिलीय. चल लवकर." असे ओरडत ईशा आत गेली नि डिशेस भरून बाहेर आली. पहिला घास चवीने खाताना चुटकी मारीत शेरा दिला.
 "क्ला ऽ ऽ स, अज्जू पोहे मस्ताड जमलेत."
 मंगेश त्या स्कूटरचोर पोरीकडे डोळे वटारून पोहे खात होता. पाहता पाहता सांज उतरून भुईवर लोळू लागली. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशींना भाकरी नि पिठलं करायला सांगून रजनी मंगेशला घेऊन आत निघाली.
 "रंजन, त्या स्कूटरचोर पोरीला खुशाल खाऊ घालतेस. रजन, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?"

स्कूटरचोर मुलगी / ३५