पान:कथाली.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रजनीने फोन ठेवला आणि ती नव्या उमेदीने मंगेशजवळ गेली. "मंगेश, सुधांशू... सुधा आलाय. स्टेटसहून. तुला येणारेय भेटायला."
 "ये म्हणावं. त्याचा किती आग्रह. त्याच्या अनुपमशी नीताचा विवाह व्हावा म्हणून. पण ही मुलगी मुर्ख. त्या अजावर भाळलीय. अनुपम शेवटी निराश होऊन गेल्या महिन्यात गेला लंडनला... जाऊ दे. मुलांपुढे कायं चालणार आपलं? हं चला, हा माझा एक्का बदामाचा. हलकं पान टाक. नसलं तर मारू नको हं किलवर सत्त्याने. चौकट टाक." मंगेशने बदाम एक्का खाली टाकत बंजावले. खरं तर रजनीकडची बदामची पानं संपली आहेत. किलवर... या हुकुमाच्या दश्शाने मारायला हवं नि हात करायला हवा. पण मग मंग्या चिडतो. कधी कधी हाय होतो. संताप सहन होत नाही. ती मुकाट्यानं चौकटचा राजा टाकून मंगेशला हात देते...
 संध्याकाळ होत आलीय. पण रखरखणाऱ्या उन्हाचा पिसारा अजून मिटलेला नाही. मंगेश, झाडांना पाणी घाल. तू लावलेल्या आंब्याला यंदा किती मोहोर आला होता ना? सात आंबे पिकवून खाल्लेसुद्धा आपण. मोगरा, जुई छान फुलल्या आहेत. आणि तो माझा सायलीचा मंडप. कसा सुवासाने घमघमतोय. मी आत जाऊन येते. असं म्हणत रजनी आत गेली.
 मंगेश शहाण्या मुलासारखा झाडांना पाणी घालू लागला. रजनीला गेली पाच-सहा वर्षे हा प्रश्न अक्षरशः खातोय, कुरतडतोय. मंगेशसारख्या अत्यंत हुशार मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला अल्झायमर... त्यातही, अल्झायमर डिमेन्शिया का व्हावा?... का व्हावा?
 रजनी चाळीसगावसारख्या लहान पण व्यापाराने गजबजलेल्या गावात वाढली. वडील वकील होते. बारा एकर पाणभरतीच्या शेतात राबायला त्यांना जास्त आवडे. रजनीने समाजशास्त्र विषयाची पदवी घेतली. आणि ती मुंबईच्या... चेंबूर येथील टाटा समाजविज्ञान केंद्रात दाखल झाली. पदव्युत्तर...कृतिशील समाज विज्ञानाची पदवी-एम.एस.डब्ल्यू.-मिळविल्यावर पुण्याच्या मानसरोग रुग्णालयात तिला एक महिन्याची क्लॉकप्लेसमेंट... अनुभवासाठी एक महिना प्रशिक्षण... घेण्याची संधी मिळाली. तिथेच तिचा आणि मंगेशचा परिचय झाला. मंगेश मूळचा सांगलीचा. वडील तेथील विलिंग्डन महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक होते. पण मंगेशला मात्र मानसशास्त्राची विशेष ओढ होती. त्याचे आजोबा गणितज्ज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ होते. दाते पंचांगाच्या

३४ /कथाली