पान:कथाली.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 छल्लोजिजींचे रूप वरचेवर निरखत चालले होते. तिच्या बाकदार भिवयांचा बाँक आणखीनच झोकदार बनला. डोळ्यांचे काजळकाठ पाणीदार झाले. साध्या चालण्यातही लय आली. मी तिला छलकन् जिजी कधी म्हणायला लागले ते कळलेच नाही. तिचे निराळेपण तिला जाणवत असे. तिचे हसणे दिलखुलास आणि जरा जास्तच ठासून होऊ लागले. धन्नूचाचांचे दुकान वाढले. ते परगावी गेले की गल्ला छलकन् सांभाळे. तिल्लक, सगाई, ब्यावसावाच्या समारंभात रसोईवर देखरेख करायला छलकन् जिजीच लागे. लग्नकार्यातले सारे रीतीरिवाज तिला इत्थंभूत माहीत असत. कुण्या माहेरवाशिणीची सासरी पाठवणी करायची असेल, तर बुंदीचे लाडू बांधायला जिजीच लागे.
 "मंगलीकी बाई, थे पाच सवासण्या पेला लड्डू" जल्दी बांधो भला. बाकी मै सब निपटर लूँ... पाच सवाष्णींनी पाच लाडू बांधल्यावर बाकीचे सारे आवरीन मी. तुम्हाला इतर कामंही पाहता येतील." असे म्हणत भल्या मोठ्या पितळी परातीत बांधेसूद लाडवांची चळत ती रचून टाकी.
 बायका लग्नाची कामे मुक्याने करू लागल्या किंवा भाजी निवडू लागल्या की ही हटकून म्हणणार यान काई जी. बधावाके गीत तो गाओ. मुक्यानं लग्नाची कामं करतात काहो भाभी? ओठातून गाणी येतात तसे हातही भराभरा चालतात.."आणि मग ती स्वतःच गुणगुणायला लागणार!
 आमच्या चुलत्याच्या घरी लग्न होतं. रात्रीची जेवणीखाणी आटोपली की रोज नवरीला नटवून चौरंगावर बसवीत. नवरीच्या भावी जीवनाची, तिच्या होणाऱ्या पतीराजाच्या प्रेमाची, सासरच्या लोकांच्या खोड्या काढणारी गीतं बायका गात आणि शेवटी तिची नजर उतरवण्याची गाणी गायली जात. त्याला 'वारणा का गीत' म्हणतात. छलकन् जिजीला तऱ्हेतऱ्हेची गाणी येत. बुंदेलखंडी गाणी मोठी नखरेदार! तिच्या गाण्यातली नवेलीबहू माहेरी आल्यावर आपल्या सख्यांना सासरी केलेला पराक्रम सांगत असते. त्यात सासऱ्याच्या हातभर मिश्या कशा कापल्याच्या नाही तर भांडखोर जावेला पेटीत कोंबल्याच्या बाता असत पण छल्लोजिजीचे खास आवडते, अगदी लाडके गाणे वेगळेच होते.
 ...त्या गाण्यातली नाजूक बहुराणी आपल्या पतीराजांना लाडिकपणे सूचना देत असते... उन्हाळ्याच्या कहरात लगीन केलंत..निदान आता खसाचा पंखा मागवा आणि मगच रसदार बनीच्या सहवासाचा आनंद लुटा आणि हे पाहा,

गेंदलासु गोद भराओ जी बन्ना / २५