पान:कथाली.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धन्नू चाचाच्या हातची. घरातले चारही भाऊ दुकानात खपतात. त्यांच्या बायकाही मदत करतात. मंझली काकीच्या लग्नात दहेजसोबत नऊ वर्षांची छलकन् इथे आली. ती कायमचीच.
 'छल्लो जिजींचे खरे नाव तिलासुद्धा याद नव्हते. बहुधा छटाकी असावे. हो, छटाकीच. मंझली काकी खूप वैतागायची तेव्हा, "ए छलकन् छटाकी, कटनं मरी अेSS" असे ओरडत असे. छल्लोजिजी मंझल्याकाकीच्या मामाची पोर..काकीच्या आईने आपल्या मेलेल्या भावाच्या एकुलत्या एक पोरीला कापसाच्या बोळ्याने दूध पाजवून जगवले. जन्मायच्या आधी चार महिने तिचा बाप खर्चला. आठ दिवसांची असताना बाळंतपणाने माय मेली. आपल्या भावाची लेक खात्यापित्या घरात जावी या हेतूने काकीच्या आईने छलकन् चे लग्न सियालडुंग्याच्या लंगड्या मुलाशी करून दिले. ते अधू पोर दोन वर्षांत पार खर्चले आणि छलकन् वयाच्या आठव्या वर्षी रांड होऊन... विधवा होऊन भुवाजीच्या घरी परतली. मंझलीकाकी एकुलती एक. तिच्या लग्नाआधीच तिची आई, छल्लोची आत्याबाई कॉलऱ्याने मरून गेली आणि मंझली काकीच्या लग्नात दहेजसोबत नऊ वर्षाची छलकन् मणीनगरला आली.
 काकीच्या घरातली सारी कामे छल्लोजिजी करी. काकी घोडनवरी होती म्हणे. लग्नात पंधरा वर्षांची म्हणजे त्या वेळची घोडनवरीच. शिवाय काळी: किंचित दात पुढे आलेले. पण सोबत दागदागिने, वीस एकराचा जमिनीचा तुकडा घेऊन आलेली आणि कामात चंचल असलेली छल्लोही बरोबर.
 छल्लो... कोवळ्या नारळाच्या खोबऱ्यासारखा दुधाळ रेशमी रंग. लाल ठिपका काढावा अशी लालचुटूक जिवणी. अपरं नाक बाँकदार भिवया. दाट पापण्यांची झालर असलेले जांभुळरंगी डोळे बाहुलीसारखा ठुसका बांधा. पायातले चाळ झुमकावीत इकडे तिकडे वावरणारी. दुकानात मिठाईचे पुडे झटपट बांधून देणारी. गोड हसणारी छलकन् कुणालाही आवडे.
 'आमचं घर सुधारकाचं. घरात इतरांच्या तुलनेने सोवळे ओवळे बेताचे होते. मोठमोठ्या राजकारण्यांची नेहमीच उठबस असे. घरात पुस्तकांच्या चवडी रचलेल्या असत. धन्नूचाचाच्या घरीही छलकन् ची तोलतोल होई. धन्नूचाचा आठवडी बाजाराला जाई किंवा खरेदीला जाई तेव्हा छल्लो गल्ल्यावर बिनधास्त बसत असे. हिशेबात हुशार झाली होती. मिठाई तयार करण्याची खास गुपितं तिने

२२ /कथाली