पान:कथाली.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधी राहणी बरोबर घेऊन आले. आमच्या बाईचा... माताजींचा धुंगटही दूर झाला. अर्थात जबरदस्तीच करावी लागली असणार.
 तर असं आमचं घर. ३५/४० वर्षांपूर्वी गावातील प्रत्येकजण एकमेकांना ओळखीत असे. गावाच्या उत्तरेला आदिवासींचे पाडे होते. गावात ठाकूर, जाट, राजपुतांची संख्या मोठी. चार दोन जैनांची, चार पाच वाण्याची..... मारवाड्याची घरं. दहाबारां ब्राह्मणांची. चमार आळी, नाई गल्ली वेगळी होती. शिवाय गावच्या शिवेलगत कुंभार, लोहार, सुताराची चारदोन घरं. शिवाय लखीरही असे. बहुतेक घराना पुढे अंगण, ओटा. मध्ये अंगण त्याच्या पल्याड राहण्यासाठी खोल्या. घराच्या आतलं जग कोणाला दिसू नये म्हणून जाड चवाळ्याचा पडदा....पोत्याच्या कापडाचा पडदा ओसरीतून आत जायच्या दरवाजाला टांगलेला असे! भल्या घरच्या सासुरवाशिणी वर्षातून जेमतेम दोनचार वेळा घराबाहेर पडणार. दिवाळीच्या 'रामराम'साठी नाही तर बड्डी तिजेच्या वेळी झोके खेळण्यासाठी. बाहेर पडायचे ते पूर्ण चेहरा झाकेल एवढा लांब घुगट घेऊन. तिजेच झोके खेळायला बैदनाथ ठाकुराच्या आमराईत शंभर दीडशे बाई जमा होई. ठाकुराच्या बड्या बिन्नीनी... मोठ्या बायकोने तिथे फरशीचे अंगण करून घेतले होते. पत्र्याची एक खोली बांधली होती. तिथे महिला चिरम्यांचा खेळ खेळीत. चिरम्या म्हणजे लाल गुंजा लालचुटूक गुंजा वाळूच्या ढिगाऱ्यात लपवून कौशल्याने त्याचे जेवढ्या महिला तेवढे भाग करीत. एकेकजण त्यातला भाग मागून घेई. त्यात लपविलेल्या गुंजा तिच्या मालकीच्या होत. सात सात, आठ आठ गट चिरम्या खेळायला बसत. परतताना बड्या घरची बहू कफल्लक होऊन घरी परत जाई. तर गरिबावरची बिन्नी गुंजांचा मोठा साठा पदरात बांधून घर गाठे. दिवसभर गावातल्या बाया या आमराईत झोके नि चिरम्या खेळताना भवरुनाईच्या दोघी म्हाताऱ्या, धन्नू शर्माची आई बडीनानी येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषमाणसाना हाकारून सांगत.
 "ईय्या मती आ रे ऽऽ. लुगाया हिंडोला झुलत हैss"
 आमचे घर, बडी कोठी गावाच्या सुरुवातीलाच आहे. बारा खोल्यांची दुमजली कोठी. तिथून मारवाडी गल्ली सुरू होते. शेजारी पाचसहा घरे चुलत्या मालत्यांची आहेत. त्यांच्या बापदादांना आमच्या पणजोबांनी मणीनगरला आणले. समोरची घरे आहेत हलवायांची. धन्नू शर्माचे मिठाईचे दुकान पंचक्रोशीत मशहूर आहे. गुलाबजामून, गरम जिलेबी, रसगुल्ला, काजूकतली आणि रतलामी शेव खावी

गेंदलासु गोद भराओ जी बन्ना / २१