पान:कथाली.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंगळवारी बाजार भरतो. वर्षातून दोन वेळा जत्रा. एक शीतलामाईची, चैत्री सप्तमीला भरणारी दुसरी मार्गेसरीतली अंबामातेची. शिवाय गढावर... भाद्रपदी तिजेला जलवॉमाईचा मेळा भरतो. त्या दिवसांत घराघरांतल्या सुवासिनी, घरातला काशाचा लोटा घेऊन गढावर जाणारच. आणि तिथल्या सतीबावडीचे पाणी...डोक्यावरून वाजत गाजत घोळक्याने गावात आणणार. पाणी घरभर शिंपडून उरलेलं घरातल्या विहिरीत टाकणार. या मेळ्यात रहाटपाळणे, नवटंकी, सिनेमा येई. मेंढ्याचा बाजार भरे. राजस्थान लखनौपासून व्यापारी खरेदीसाठी येत आणि म्हणूनच बाबूजींनी थोडे प्रयत्न केले आणि मणिपूरला तहसील आली, कोर्ट आले. आणि आता ऐकतेय की सरगुजा जिल्ह्याचे दोन भाग होऊन मणीनगर जिल्हा होतोय.
 तर असे हे आमचे मणीनगर. मणीनगरच्या महाराजावंशजांची काही घरं सोडली तर, सुधारीत वतनदाराचे घर आमचेच. आमचे पडदादाजी. म्हणजे पणजोबा मूळचे राजस्थानचे. बस्सी तालुक्यातल्या लहान गावात त्यांचे घर होते. परंतु घरच्या हलाखीमुळे ते जयपूरच्या एका जवाहिऱ्याकडे राहिले. पुढे मुनीम म्हणून त्यांची बढती झाली. ते एकदा खड्यांच्या खरेदीसाठी मद्रासला गेले होते. मणीगढच्या महाराजांची आणि त्यांची पहिली भेट तिथेच झाली. महाराज इंग्रज साहेबाला भेटायला मद्रासला गेले होते. तिथे त्यांचा झाला अपमान. त्या घावाने ते आजारी पडले. तापाने तुफान फणफणले. बरोबरीची माणसं, म्हाताऱ्या महाराजांजवळचे पैसे जवाहीर घेऊन पळाली. रात्री पणजोबांना शेजारच्या खोलीतून कशाचा तरी आवाज ऐकू आला. आवाजाचा वेध घेऊन पाहिले तर एक वृद्ध गृहस्थ तापाने फणफणून कोपऱ्यात कण्हताहेत. पणजोबांनी वैद्य बोलावून औषधपाणी दिले. मणिगढावरच्या राजवाड्यात काळजीपूर्वक सोडले. तेव्हापासूनचा ऋणानुबंध. महाराजांनी पणजोबांना मणीनगरला आणलं. नर्मदेकाठची शंभर एकर जमीन, दोन वाडे आणि साहुकार ही पदवी दिली. आमचे मूळ आडनाव भार्गव: पण तेव्हापासून आम्ही 'साहुजी' झालो.
 माझे दादाजी मणीनगरचे दिवाण म्हणून काम पाहत. ते विद्येचे भोक्ते होते. इंग्रजी शिकवण्यासाठी एक इंग्रजी शिपाई त्यांनी मेहनताना देऊन वर्षभर ठेवून घेतला. संस्कृतचा दांडगा अभ्यास होता. माझ्या पणजोबांमुळे त्यांना संधी मिळाली. माझ्या बाबुजींना तर त्यांनी शिक्षणासाठी बनारसला ठेवले. तिथे बाबुजी काँग्रेसी मेळाव्यात पूर्णपणे सामील झाले. शिक्षण संपवून परतताना चरखा, खादी,

२० /कथाली