पान:कथाली.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता नाहीसे झालेय. तरीही, ते नसल्यामुळे आलेले रिकामेपण मन कापीत जाते...
 गेली बत्तीस-पस्तीस वर्षे, हे असले विचित्र आणि आरपार छिन्न करणारे रिकामपण उरावर बांधून कशी जगली असेल छल्लो?...? बहरहाल, मै मुक्तिका अहसास दिलमें बसाने का प्रयास, कर तो रहा हूँ.
 चि. अशोकजी कैसे है? चिन्मय, मृण्मय की पढाई कैसे चल रही है? अुनको शुभाशिष. यह खत किसीको दिखाओगी नही...
 सोन्यानाण्याचा उपयोग तू योग्य रीतीने करशील असा विश्वास छल्लोने व्यक्त केलाय.
 शेष मंगल.

भवदीय,

मनहरभैया.

 मनहरभैयांचे पत्र वाचताना माझे मन थेट माणिकनगरला जाऊन पोचले...माझ्यासमोर होती निचेष्ट छलकन् जिजी. रामनामाच्या भगव्या चादरीने झाकलेली. दोन बाँकदार भिवयांच्या मधोमध रेखलेला चंदनाचा टिळा ती इतका रेखून लावी की, बघणाऱ्याला वाटे कुंकुम तिलकच रेखलाय. आणि तिचे लांबसडक पापण्यांची मोहोरेदार किनार असलेले जांभुळरंगी डोळे? ते आता मिटलेले आहेत. चेहऱ्यावर आठी कधी नसायचीच. पण आता मनावरच्या,चुण्याही नाहीशा झाल्या आहेत....
 तिचे ते रूप पाहता पाहता लक्षात आले की मी मणीनगरमध्ये नाही, तर औरंगाबादेत आहे.
 माझे बाबूजी मणीनगरचे वतनदार वकील. आता मणीनगर कुठे वसलेय हेही सांगायला हवे. बुंदेलखंडांचे नाव नक्कीच ऐकलं असेल तुम्ही. ऐकलेय ना? जबलपूरवरून थेट पूर्वेला जाणाऱ्या रस्त्यावरून चाळीस एक मैल गेलात की मणिपूर लागते. म्हणजे आधी एक भुईकोट किल्ला लागतो. ते मणीगढ आणि भोवताली वसलेय ते मणीनगर, गाव तसे लहानसेच. भोळ्याभाबड्या चेहऱ्यांचे. भोवतालच्या चाळीसपन्नास खेड्यावस्त्यांना या गावाचा आधार आहे. दर

गेंदलासु गोद भराओ जी बन्ना / १९